फेसबुक, व्हॉट्सअॅपमुळे घटतेय दीड तासाची झोप

20

सामना ऑनलाईन । मुंबई

व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून सतत अपडेट राहणाऱ्यांसाठी एक धोक्याची सूचना आहे. झोपतेवेळी फेसबुक किंवा व्हॉट्सअॅपचा वापर तुमच्या झोपेचा शत्रू बनू शकतो. बंगळुरूमधील राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि चेताविज्ञान संस्थेने केलेल्या एका चाचणीनुसार अशा अपडेट राहण्याच्या सवयीमुळे तुमच्या झोपेत दर दिवशी दीड तासाची घट होतेय. झोपतेवेळी सतत फोन चेक करत राहण्याच्या सवयीमुळे मेंदूकडून झोपेची आज्ञा मिळाल्यावरही शरीर जागं राहतं. या सवयीमुळे तुम्ही रोजची दीड तासाची झोप गमावून बसता, असं या चाचणीत समोर आलं आहे.

सोशल मीडियावर सतत अपडेट राहण्यासाठीच्या धडपडीमुळे झोपेचं चक्र बिघडतं. त्यामुळे बराच वेळ झोप न लागणं, झोपमोड होणं, ताण, डिप्रेशन असे त्रास उद्भवून हृदयावर ताण पडू शकतो. सध्या तरुणांमध्ये वाढत असलेलं हृदयविकाराच्या धक्क्यांचं प्रमाण पाहता सोशल मीडियाचा वापर नियंत्रित करण्याचा सल्ला या चाचणीत देण्यात आला आहे.

अनेक मानसोपचार तज्ज्ञांकडे डिलेयड स्लीप फेज सिंड्रोम (डीएसपीएस) असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असून हा आजार सोशल मीडियाच्या झोपेवरच्या अतिक्रमणामुळे उद्भवतो. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी एक तास सर्व इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स बंद करून पुस्तक वाचन करावे किंवा घरच्यांसोबत गप्पा माराव्यात, असा सल्लाही या अहवालात देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या