फेसबुकची कठोर कारवाई; ५८ कोटी फेक अकाउंट डिलीट

8

सामना ऑनलाईन । मुंबई

जगातील सर्वात मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अशी ओळख असणाऱ्या फेसबुकने २०१८ च्या पहिल्या तीन महिन्यांत तब्बल ५८ कोटी ३० लाख फेक अकाउंट बंद केले आहेत. या प्रकरणी फेसबुकने सांगितले की, या अकाउंटद्वारे फेसबुकच्या कम्युनिटी स्टँडर्डचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त फेसबुकने असेही सांगितले आहे की, येत्या काळात ते प्रक्षोभक किंवा हिंसक चित्र, दहशतवाही प्रचार तसेच समाजात द्वेश पसरवणाऱ्या फेसबुक अकाउंट्स विरोधातही कठोर पावले उचलणार आहेत.

कॅम्ब्रिज अॅनालिटीका डेटा लिक प्रकरणानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या फेसबुकने त्यानंतरच्या काळात कठोर पावले उचलत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. अशातच दररोज सुरू होणाऱ्या लाखो फेक अकाउंटवर रोख लावण्याचा फेसबुक प्रयत्न करत आहे. फेसबुकने कठोर पावले उचलली तरीही एकूण फेसबुकवरील अॅक्टिव्ह अकाउंट्सपैकी ३ ते ४ टक्के फेसबुक प्रोफाईल या फेक आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत केंब्रिज अॅनालिटिका या ब्रिटनमधील कंपनीने ८७ दशलक्ष फेसबुक युजर्सची माहिती चोरल्याचे समोर आले होते. या प्रकरणीची चौकशी अद्याप सुरूच आहे. याप्रकरणात फेसबुक वादाच्या भोवऱ्यातही अडकले होते. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर फेसबुककडून काही दिवसांपूर्वीच जवळपास २०० अॅप्स हटवण्यात आले होते. याप्रकरणी फेसबुकच्या या अॅप्सच्या माध्यमातून यूजर्सच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर केल्याचे समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या