तुमची फेसबुक पोस्ट उडाली आहे? का ते वाचा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर जगभरातील अनेक लोक हे सतत अॅक्टीव्ह असतात. मात्र अचानक एखादी पोस्ट डिलीट झाली तर नक्कीच तुम्ही विचारात पडाल. पण फेसबुकने याचे कारण जाहीर केले आहे. फेसबुकनेच तब्बल तीन कोटी पोस्ट या डिलीट केल्या आहेत. २०१८च्या पहिल्या तीन महिन्यात फेसबुकने या पोस्ट डिलीट केल्या आहेत. डिलीट केलेल्या पोस्टमध्ये सेक्सविषयक आणि द्वेष पसरवणाऱ्या काही आक्षेपार्ह पोस्टचा समावेश आहे.

‘केंब्रिज अॅनालिटिका डेटा प्रायव्हसी’ प्रकरणानंतर फेसबुकने पारदर्शकतेसाठी कम्युनिटी स्टॅडर्डच्या अंतर्गत सादर केलेल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. यामध्ये फेसबुकने आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करत तंत्रज्ञानाच्या मदतीने तब्बल ३ कोटी ४० लाख पोस्टवर कारवाई केलेली आहे. २०१७च्या शेवटच्या तीन महिन्याच्या तुलनेत या पोस्टचा आकडा ही तीनपट होता. फेसबुकने दिलेल्या रिपोर्टमध्ये त्यांनी २०० अॅप हटवल्याची माहिती दिली आहे. मात्र हे हटवताना त्याची तपासणी ही करण्यात आली होती. या अॅपच्या माध्यमातून यूजर्सच्या खासगी माहितीचा गैरवापर होत असल्याची चौकशी सुरू आहे. या हटवलेल्या पोस्टमध्ये प्रामुख्याने आक्षेपार्ह माहिती समावेश असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.