फेसबुकवर मैत्री, ‘सीए’ समजून सर्वस्व दिले; ‘तो’ निघाला कपड्याच्या दुकानातील कामगार!

5855

चार वर्षांपूर्वी फेसबुकवर मैत्री झाली, मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले, त्यानंतर दोघांची मनेही जुळली आणि दोघांनी जीवन मरणाच्या शपथा खात एकमेकांना मिठीतही घेतले. मात्र चार वर्षानंतर मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला प्रेम करणारा तरुण हा विवाहित असल्याचे समजले. यानंतर आपण फसलो गेल्याने तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि शेवटी पोलीस ठाणे गाठण्याची वेळ आली. ही घटना घडली आहे अलिबागमधील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजात बीएचएमएसच्या शेवटच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनी सोबत. विशेष म्हणजे प्रेमी हा ‘सीए’ असल्याची बतावणी करीत असून मुळात एका कपड्याच्या दुकानात काम करीत असल्याचे समोर आले आहे. या इसमाविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पीडित तरुण विद्यार्थिनी ही कांदिवली येथील राहणारी असून अलिबाग मधील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. बीएचएमएस पदवीच्या शेवटच्या वर्षात ती आहे. विद्यार्थिनीला फसविणारा आरोपी तरुण हा सुद्धा चारकोप, कांदिवली येथे राहतो. चार वर्षांपूर्वी पीडित विद्यार्थिनी फिर्यादी आणि आरोपी यांची फेसबुक या सोशल मीडियावर मैत्री झाली. आरोपी याने आपण सीए असल्याचे पीडित विद्यार्थिनीस सांगितले होते. त्यानंतर मैत्री होऊन त्याचे प्रेमही जुळले. चार वर्षे आरोपी याने फिर्यादी हिला लग्नाचे अमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. आरोपी हा अलिबाग येथे येऊन पीडित तरुणीला भेटत ही होता.

पीडित तरुण विद्यार्थिनीने लग्नाचा तगादा लावला असता आरोपी हा टाळाटाळ करीत होता. फिर्यादी हिने चौकशी केली असता आरोपी हा सीए नसून एका कपड्याच्या दुकानात कामाला असून विवाहित असल्याचे कळले. त्यानंतर पीडित विद्यार्थिनीने आपण फसलो गेल्याचे समजल्यावर अलिबाग पोलीस ठाणे गाठून आरोपी विरोधात कलम 376, 420, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अलिबाग पोलीस या प्रकरणाबाबत तपास करीत असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या