फेसबुक, ट्विटर, गुगलवरून गायब होणार पाकिस्तान!

1539

आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पाकिस्तानच्या अडचणीत आता आणखी वाढ होणार आहे. सोशल मिडीयावर नावाजलेल्या फेसबुक, ट्विटर आणि गुगलसह अनेक कंपन्यांनी पाकिस्तानविरोधात आघाडी उघडली आहे. पाकिस्तानने सोशल मिडीयाबाबतच्या त्यांच्या कायद्यात बदल केले नाही तर सेवा बंद करण्याचा इशाराही या कंपन्यांनी दिला आहे. या कंपन्यांनी पाकिस्तानातील सेवा बंद केल्यास फेसबुक, ट्विटर आणि गुगलवरून पाकिस्तान गायब होणार आहे. फेसबुक, गुगल आणि ट्विटरसारख्या सोशल मिडीयावरील कंपन्यांसाठी पाकिस्तानने केलेला सेन्सॉरशिपचा कायदा आता पाकिस्तानच्या अंगलट येत आहे. या कायद्याला विरोध करत कंपन्यानी सेवा बंद करण्याचा इशारा पाकिस्तानला दिला आहे. पाकिस्तानने केलेल्या नव्या कायद्यामुळे पाकिस्तानात सेवा पुरवणे कठीण असल्याचे या कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. आशिया इंटरनेट कोलिशनने (एआयसी) पाकिस्तान सरकारला पत्र पाठवून कायद्यात योग्य ते बदल करण्याचे आवाहन केले आहे.

खासगी माहितीचा अधिकार, व्यक्तिस्वातंत्र्य,अभिव्यक्ती स्वातंत्र्य याबाबतच्या तक्रारींवर पाकिस्तान सरकारने योग्य पावले उचलली नसल्याचे या कंपन्यांचे म्हणणे आहे. पाकिस्तानात ऑनलाइन आशयाबाबतचे कायदे आधीच कठोर असताना नवे नियम लादण्यात आले आहेत. या कायद्यातील नियम अस्पष्ट आहेत. तसेच हे नियम पाकिस्तानातील 7 कोटी इंटरनेट यूजर्सच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि खासगी माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचेही कंपन्यांनी म्हटले आहे. यावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात आला नाही, तर नाइलाजाने पाकिस्तानातील सेवा बंद कराव्या लागतील, असेही कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच हा कायदा करताना पाकिस्तानने तज्ज्ञांचा सल्ला घेतला नसल्याचा आरोपही कंपन्यांनी केला आहे.

पाकिस्तानने केलेल्या नव्या कायद्यात आक्षेपार्ह मजकूर किंवा आशय याबाबत स्पष्टता नाही. कोणताही आशय किंवा मजकूर आक्षेपार्ह ठरवला जाऊ शकतो आणि त्याविरोधात अपीलही करता येणार आहे. याविरोधात अपील केल्यानंतर 24 तासात तो मजकूर कंपनीला हटवावा लागणार आहे. त्यासाठी 6 तासांची वेळ देण्यात आली आहे. तसेच आक्षेपार्ह मजकूराची तक्रार देणाऱ्याचे नावही गुप्त ठेवण्यात येणार आहे. या नव्या कायद्यानुसार या कपंन्यांना पाकिस्तानात कायमस्वरुपी कार्यालय उभारावे लागणार आहे. तसेच लोकल सर्व्हरचीही व्यवस्था करावी लागणार आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास 50 कोटींचा दंडही आकारण्यात येणार आहे. या कायद्यामुळे पाकिस्तानात सेवा देणे कठीण असल्याचे कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच कायद्यात योग्य ते बदल केले नाहीत, तर सेवा बंद करण्याचा इशारा कंपन्यांनी दिला आहे. आता या कंपन्यांना सरकार काय प्रतिक्रिया देणार, त्यावर पाकिस्तानातील सोशल मिडीयाचे भवितव्य अवलंबून आहे. कंपन्यांना आवश्यक असणारे बदल सरकारने केले नाही, तर गुगल फेसबुक, ट्विटरवरून पाकिस्तान गायब होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या