महाविजय दिवस

325

>>प्रतीक राजूरकर

हिंदुस्थानच्या युद्धाच्या इतिहासात बांगलादेश विजयासारखा भव्यदिव्य विजय आजवर प्राप्त झालेला नाही. जगाने हिंदुस्थानच्या पराक्रमाची त्यावेळी दखल घेतली होती. हिंदुस्थानच्या शौर्यशाली इतिहासातील सोनेरी पान म्हणून 16 डिसेंबर हा दिवस ओळखला जातो. 3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हल्ल्याला हिंदुस्थानी सैन्याने सडेतोड उत्तर दिले. पाकिस्तानने सुरू केलेले युद्ध अवघ्या 14 दिवसांत निर्णायक ठरले.

हिंदुस्थानच्या शौर्यशाली इतिहासातील सोनेरी पान म्हणून 16 डिसेंबर हा दिवस ओळखला जातो. 3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हल्ल्याला हिंदुस्थानी सैन्याने सडेतोड उत्तर दिले. पाकिस्तानने सुरू केलेले युद्ध अवघ्या 14 दिवसांत 16 डिसेंबर रोजी निर्णायक ठरले. पाकिस्तान हिंदुस्थानला शरण आला. 93 हजार पाकिस्तानी सैनिक युद्धकैदी म्हणून हिंदुस्थानच्या ताब्यात होते. हिंदुस्थानी सैन्याने 244 पाकिस्तानी टँक, 94 युद्ध विमाने, 22 जहाजे, 4 युद्धनौका, दोन पाणबुडय़ा नेस्तनाबूत केल्या होत्या. पाकिस्तानच्या हजारो मैल भूभागावर तिरंगा डौलाने फडकत होता. या देदीप्यमान विजयाचे शिल्पकार हिंदुस्थानी सैन्य, रॉचे तत्कालीन मुख्य रामेश्वरनाथ काव, त्यावेळचे लष्करप्रमुख जनरल माणेकशॉ व दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. हिंदुस्थानी सैन्यातील दोन हजार 307 सैनिकांनी या युद्धात हौतात्म्य पत्करले.

बांगलादेश युद्ध म्हणून ओळखले जाणारे हे युद्ध होणार याची पूर्वकल्पना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना होती. त्याकाळचा पूर्व पाकिस्तान म्हणजे आजच्या बांगलादेशात पाकिस्तानी सैन्याकडून त्यावेळी अनन्वित अत्याचार सुरू होते. ऑक्टोबर 1971 मध्ये नटवरसिंग पोलंडचे राजदूत असताना पाकिस्तानी राजदूत एक बंगाली गृहस्थ होते. पाकिस्तानी राजदूतांनी जिनिव्हा येथील पाकिस्तानी राजदूतांच्या बैठकीतील गुप्त माहिती नटवरसिंगांना दिली होती. इंदिरा गांधींनी आमच्या लोकांना वाचवावे म्हणून विनवणी केल्याचे नटवरसिंग लिहितात. पुढे काही दिवसांतच राजदूतांचा गुप्त कोडसुद्धा पाकिस्तानी राजदूतांनी नटवरसिंग यांना दिला. या घटनेवरून पूर्व पाकिस्तानातील दहशत आणि अत्याचाराचा अंदाज येऊ शकतो.

मार्च 1971 मध्येच इंदिरा गांधींनी जनरल माणेकशॉ यांना सैन्याच्या पूर्वतयारीच्या सूचना दिल्या होत्या. माणेकशॉ यांनी त्यांना यासाठी सहा महिन्यांचा कालावधी हवा म्हणून केलेली विनंती गांधींनी मान्य केली होती. हिंदुस्थानची रणनीती दोन टप्प्यांत निश्चित झाली होती. पहिला टप्पा ‘गोरिला ऑपरेशन’ हा होता. त्यात रॉच्या माध्यमातून पूर्व पाकिस्तानातील एक लाख नागरिकांना सैनिकी प्रशिक्षण देण्याचे कार्य सुरू करण्यात आले. यातूनच बांगलामुक्ती वाहिनीची निर्मिती झाली. पुढे युद्ध संपेपर्यंत मुक्ती वाहिनी रॉच्या माध्यमातून कार्यरत होती. उल्लेखनीय म्हणजे, तेव्हा रॉचे वय होते अवघे अडीच वर्षे. दुसरा टप्पा हा प्रत्यक्ष हिंदुस्थानी सैन्याच्या सहभागाचा होता. तो पाकिस्तानने स्वतः 3 डिसेंबर 1971 रोजी हल्ला करून ओढवून घेतला.

वास्तविक, इंदिरा गांधींनी पाकिस्तानच्या अंतर्गत यादवीत हस्तक्षेप करण्याचे कारण काय, असा अनेकांना प्रश्न पडू शकतो. अनेकांचा गैरसमज आहे की, पाकिस्तानच्या अतिरेकी कारवाया या 1989 साली कश्मीर खोऱयात सुरू झाल्या, परंतु रॉच्या माहितीप्रमाणे त्या 1956 पासूनच नागालँडमध्ये सुरू झाल्या. काही नागा बंडखोरांना पाकिस्तानने पूर्व पाकिस्तानात सैनिकी प्रशिक्षण दिले होते. पुढे 1960 साली मिझो नॅशनल फ्रंटच्या नेत्यांनासुद्धा असेच प्रशिक्षित करून चीनच्या प्रभावाखाली पूर्व पाकिस्तानातील सैन्य अधिकाऱयांनी आणले होते. त्यामुळे आयएसआयच्या हिंदुस्थानविरोधी कारवायांना चाप बसावा म्हणून इंदिरा गांधींनी हा निर्णय घेतला.

3 डिसेंबर 1971 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता पाकिस्तानी वायुदलाने हिंदुस्थानात अनेक हवाई तळांवर हल्ला केला. इंदिरा गांधींनी रेडिओवरून देशाला संबोधित करून याबाबत माहिती दिली. या हल्ल्याचा प्रतिकार करण्याशिवाय पर्याय नसल्याने युद्ध अटळ होते. हिंदुस्थानी सैन्याच्या तिन्ही दलांनी तत्परता दाखवत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. पूर्व व पश्चिम पाकिस्तानात हिंदुस्थानी सैन्याने पुढील 14 दिवस आपले शौर्य जगाला दाखवून दिले. 15 डिसेंबर रोजी हिंदुस्थानी सैन्याने ढाका शहराला वेढा घातला. पाकिस्तानच्या ले. जनरल नियाझींना जनरल माणेकशाँनी 16 डिसेंबर सकाळी 9 वाजेपर्यंत युद्ध थांबवण्याचा निरोप दिला. परंतु पाकिस्तानी सैन्याने 250 बंगाली विद्वान, साहित्यिक, कलाकारांना इत्यादींना वाटाघाटीसाठी ओलीस ठेवले. हिंदुस्थानी सैन्याने वाटाघाटीस नकार दिल्याने त्या सर्वांना पाकिस्तानी सैन्याने ठार केले. तिकडे हिंदुस्थानी नौदलाने कराचीचा तळ उद्ध्वस्त करून टाकला होता. अखेर 16 डिसेंबर दुपारी 4.30 वाजता ले.जनरल नियाझींनी हिंदुस्थानी ले. जनरल जगजितसिंग यांच्या समक्ष आपल्या गणवेशावरील भूषणं आणि आपले पिस्तूल रिकामे केले आणि स्वतःला जगजितसिंग यांच्या स्वाधीन करत शरणागतीची औपचारिकता पूर्ण केली.

हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तानच्या ताब्यातील 1,42,199 चौ. कि.मी.चा भूभाग वेगळा केला होता. पाकिस्तानी सैन्याचे केवळ दहा विभाग वाचले होते. त्यातील दोन सशस्त्र होते. अर्धे पाकिस्तानी हवाई दल व नाममात्र नौदल पाकिस्तानकडे शिल्लक होते. हिंदुस्थानी सैन्याने जप्त केलेल्या शस्त्रातून दोन सैनिकी विभाग उभारता आले असते. पाकिस्तानने आपली 54 टक्के लोकसंख्या गमावली होती, तर हिंदुस्थानच्या तुलनेत पाकिस्तान केवळ एक दशांश शिल्लक होता. पाकिस्तान पूर्णतः नेस्तनाबूत झाला होता. पूर्व पाकिस्तान बांगलादेशात परिवर्तित झाल्याने बांगलादेशात हिंदुस्थानचा जयघोष निनादत होता. हिंदुस्थानच्या युद्धाच्या इतिहासात बांगलादेश विजयासारखा भव्यदिव्य विजय आजवर प्राप्त झालेला नाही.

जगाने हिंदुस्थानच्या पराक्रमाची त्यावेळी दखल घेतली होती. सिमला करारावर मात्र अनेक मतमतांतरे आहेत. युद्धात जिंकलेला हिंदुस्थान करारात हरला का? ‘रॉ’चे माजी अधिकारी बी. रमण यांनी इंदिरा गांधींनी असे का केले, यावर कुणाकडेच सबळ उत्तर नसल्याचे लिहिले आहे. पाकिस्तानला युद्धात सर्वोतोपरी मदत करणारे अमेरिकेचे त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष निक्सन व त्यांचे सुरक्षा सल्लागार किसिंजर यांना हिंदुस्थानच्या सामर्थ्याचे योग्य आकलन झाले नाही. पाकिस्तानच्या युद्धातील पराभवानंतर किसिंजर निक्सन यांना म्हणाले होते, ‘आपण अनर्थाला पराभवात परिवर्तीत करू शकलो.’ खरं तर या शुभेच्छा नसून त्यांनी एकमेकांचे केलेले सांत्वनच म्हणावे लागेल’.

(या लेखासाठी पुढील पुस्तकांचा संदर्भ म्हणून उपयोग केला आहे.)

1) Mission R&AW (R K Yadav), 2) The KaoBoys Of R&AW ( B. Raman), 3) Nixon, Indira, And India (Kalyani Shankar), 4) One Life Is Not Enough (K Natwar Singh)
n [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या