मुख्यमंत्री थापाडे, सदाभाऊ खोत गद्दार – संजय पाटील

35

सामना प्रतिनिधी । अकलूज

शेतकरी संघटनांमधील सदाभाऊ खोत आणि जयाजी सुर्यवंशी यांच्यासारख्या गद्दार नेत्यांमुळे शेतकऱ्यांचे पाठीमागचे आंदोलन फसले. या नेत्यांना हाताशी धरून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांबरोबर राजकीय डावपेच खेळले. परंतु आता शेतकरी संघटना सावध झाल्या असून मुख्यमंत्र्यांच्या कोणत्याही भुलथापांना शेतकरी बळी पडणार नाही. तसेच सदाभाऊ खोतांना सोलापूर जिल्ह्यात फिरू देणार नसल्याचा खणखणीत इशारा सुकाणू समितीचे सदस्य संजय पाटील-घाटणेकर यांनी अकलूज येथे दिला.

अकलूज येथील शासकिय विश्रामगृहामध्ये शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची रविवारी बैठक पार पडली. यावेळी बोलताना घाटनेकर म्हणाले, काही गद्दार नेत्यांना हाताशी धरून शासनाने शेतकऱ्यांची फसवणुक केली आहे. शासनाने केलेली कर्जमाफीची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची निव्वळ दिशाभूल आहे. या कर्जमाफीने शेतकऱ्यांचे समाधान झालेले नाही. त्यामुळे आम्ही शासनाचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. आम्ही पुन्हा शासनाच्या विरोधात संघर्षाची भुमिका घेतलेली आहे. १० जुलैपासून नाशिक येथून शेतकरी जनजागरण यात्रा सुरू करण्यात आली आहे. ही जनजागरण यात्रा २१ जुलैला सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. तर या यात्रेची सांगता २३ जुलैला पुणे येथे होईल. तसेच २६ जुलैला पुढील आंदोलनाची दिशा ठरून त्याबद्दल घोषणा केली जाणार आहे.

शासनाने केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा कोणताच निर्णय नाही. एकत्र कुटूंबातील एकाच व्यक्तीला या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. सरकारी नोकरी, व्यापार असणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही. सन २०१५-१६ मध्ये ज्यांच्या कर्जाचे पुर्नगठण झाले त्यांना लाभ मिळणार नाही. त्यामुळे आम्हाला ही कर्जमाफी मान्य नाही. सरसरकट संपुर्ण कर्जमाफी, पिकांना हमीभाव, संपुर्ण वीजबील माफी, स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागु झाल्याशिवाय आता हे आंदोलन थांबणार नाही. आपल्या जिल्ह्यामध्ये रब्बी पीक कर्जाचे पुर्नगठण करण्यात आले आहे. त्यामुळे डिसीसी बँकेकडे असणाऱ्या १४ हजार सभासद शेतकरी कोणत्याच कॅटेगरीत बसत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर असणाऱ्या १३० कोटी रूपयांच्या कर्जाचा कोणताच निर्णय लागत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या