देवेंद्र ‘शपथ’ 40 हजार कोटींची, खासदार हेगडेंच्या विधानामुळे भाजप अडचणीत

1888

बहुमत नसतानाही रात्रीच्या अंधारात गुपचूप शपथविधी उरकून ‘पुन्हा’ मुख्यमंत्री बनण्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या अपयशी कारस्थानाने महाराष्ट्राचे 40 हजार कोटींचे नुकसान केले. महाराष्ट्रासाठी आलेला हा पैसा त्यांनी मुख्यमंत्र्याच्या अधिकाराखाली परत पाठवला. भाजपाचेच खासदार अनंतकुमार हेगडे यांनी असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे भाजपा अडचणीत आला असून फडणवीस यांच्यावर सत्ताधारी पक्षांबरोबरच सोशल मीडियावरूनही जोरदार टीका होत आहे.

अनंतकुमार हेगडे हे भाजपचे कर्नाटकातील खासदार आहेत. कर्नाटक येथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला 40 हजार कोटी रुपयांचा विकासनिधी आला होता. भाजपची सत्ता येणे अशक्य असल्याची खात्री पटल्याने आणि या

निधीचा वापर शिवसेनेच्या नेतृत्वाखालील आघाडीकडून होऊ नये म्हणून पुन्हा केंद्राला पाठवण्यासाठी देवेंद्र फडणवीस चार दिवसांचे मुख्यमंत्री बनण्याचे नाटक केले असा गौप्यस्फोट हेगडे यांनी केला. फडणवीस यांनी अवघ्या 15 तासांत हा निधी परत पाठवला असाही दावा त्यांनी केला. खासदार हेगडे यांचे हे वादग्रस्त विधान सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर राज्यात वादळ उठले आहे.

 तर पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा – राष्ट्रवादी काँग्रेस

खासदार हेगडे यांनी केलेला दावा सत्य असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पायउतार व्हायला हवे, त्यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवत्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केली. भाजपच्या राजवटीत असा अन्याय केवळ महाराष्ट्रावर नाही तर इतर राज्यांवरही होत असून तामीळनाडू, पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळमधील जनताही असा अन्याय खपवून घेणार नाही असे मलिक म्हणाले.

पंतप्रधानांनी याचा जाब द्यावा – काँग्रेस

महाराष्ट्राचा निधी केंद्राला परत पाठवला गेला असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचा जाब द्यावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे प्रवत्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवर याबद्दल संताप व्यक्त केला आहे. ‘एका केंद्रीय मंत्र्यानेच मोदी सरकारला उघडे पाडले आहे. भाजपाचा महाराष्ट्रविरोधी चेहरा उघड झाला आहे. जनतेसाठी, शेतकर्यांसाठी आलेला 40 हजार कोटींचा निधी कट करून परत पाठवला जाऊ शकतो का? पंतप्रधान उत्तर द्या!’ असे ट्विट सुरजेवाला यांनी केले आहे.

ही महाराष्ट्राशी गद्दारी – शिवसेना

महाराष्ट्रासाठी आलेला 40 हजार कोटींचा विकासनिधी केंद्राकडे परत पाठवण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाले ही महाराष्ट्रासोबत गद्दारी आहे असा संताप शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.  भाजप आणि फडणवीस हे महाराष्ट्राचे गुन्हेगार आहेत अशी टीका त्यांनी केली. तसेच मुख्य सचिवांनी याबाबत महाराष्ट्राला स्पष्टीकरण दिले पाहिजे असेही ते म्हणाले.

एक रुपयाही परत पाठवलेला नाही – फडणवीस

राज्यासाठी आलेला विकासनिधी परत पाठवण्याचा कोणताही धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री म्हणून मी घेतलेला नाही, असा दावा या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कोणत्याही प्रकल्पातला एक पैसाही केंद्राकडे परत पाठवलेला नाही. केंद्राने कोणत्याही निधीबद्दल विचारणा केलेली नाही आणि महाराष्ट्र सरकारनेही कोणताही निधी परत पाठवलेला नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्याच्या अर्थ मंत्रालयाने याची चौकशी करून सत्य बाहेर आणले पाहिजे असेही ते म्हणाले.

महाराष्ट्रासाठी आलेला विकासनिधी केंद्राला परत पाठवणे ही महाराष्ट्राशी गद्दारी आहे. शिवसेना

हे सत्य असेल तर नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा. राष्ट्रवादी काँग्रेस

कट करून निधी परत पाठवला. पंतप्रधानांनी जवाब द्यावा. काँग्रेस

एक रुपयाही परत पाठवलेला नाही. चौकशी करा. देवेंद्र फडणवीस

 मुख्यमंत्री बनण्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या अपयशी कारस्थानाने महाराष्ट्राचे 40 हजार कोटींचे नुकसान केले.

आपली प्रतिक्रिया द्या