हेतुपुरस्सर नापास केलेला विद्यार्थी झाला पास: दोषी शिक्षकांवर कारवाई करण्याचे विद्यापीठाचे आदेश

सामना प्रतिनिधी । पेण

पेण येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. पतंगराव कदम कॉलेजला मुंबई विद्यापीठाने दणका दिला आहे. कॉलेज मधील असुविधांबद्दल आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्याला हेतुपुरस्सर नापास केल्याने त्या विद्यार्थ्याला पास करून दोषी शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश विद्यापीठाने दिल्याने कॉलेज प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.

पेण येथील डॉ.पतंगराव कदम कॉलेजमध्ये शिकणारा विद्यार्थी तन्मय पाटील याने प्रथम वर्ष कला शाखेमध्ये सन २०१४-१५ मध्ये प्रवेश घेतला होता. शिक्षण घेतानाच कॉलेजमधील असुविधांबद्दल तत्कालीन प्रशासन व शिक्षण व्यवस्थेंचे लक्ष वेधण्याचे काम तन्मय पाटील याने केला होता. या संदर्भात तन्मयने प्राचार्यांना २९ प्रमुख मागण्यांचे पत्र दिले होते. अभ्यासिका खोल्यांचा अभाव, अपुरी आसन व्यवस्था, गळते वर्ग व ढासळते छत, दरवाजे व लाईट – फॅनची दुरावस्था, वाहन पार्किंग, ग्रंथालय, जिमखाना, अस्वच्छ महिला व पुरुष प्रसाधन गृह, अशुद्ध पिण्याचे पाणी, कॉलेज कँटीन, सेमिनार हॉल, मैदान व्यवस्था, कॉम्पुटर रूम, इलेक्ट्रिक बोर्ड, व कॉलेज मधील बेशिस्तपणा आदी असुविधांकडे लक्ष वेधले होते. या गोष्टीचा राग मनात धरून तन्मय पाटील याला सूडबुद्धीने परीक्षेमध्ये नापास करण्यात आले होते मात्र याचा दाट संशय आल्याने तन्मयने उत्तर पत्रिकेच्या छायांकित प्रति मागविल्या तेव्हा उत्तर पत्रिकेत एकदा दिलेले मार्क खोडून पुन्हा कमी करण्यात आल्याचे निदर्शनास आले. याबाबत मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी तक्रार निवारण कक्षाकडे तन्मयने तक्रार केली होती.

मागील ३ वर्षे याबाबत विद्यार्थी तन्मय पाटील व कॉलेज प्रशासन यांच्यामधील युक्तिवाद सुरु होता. नुकताच विद्यापीठाच्या समितीने नापास करण्याचे सूडबुध्दी कृत्य करणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई करावी, असे आदेश स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेला दिले आहेत. तन्मय पाटील यांच्या उत्तरपत्रिका पुनर्मुल्यांकन करून तो उत्तीर्ण असल्याचा निकाल दिला.

आपल्या शैक्षणिक आयुष्यामधली ३ वर्ष वाया घालवणाऱ्या प्राचार्य बाबासाहेब दुधाळे, प्रा. व्ही एल. कांबळे, प्रा. एल. एन. कुमारे, प्रा. व्ही. एम. वागतकर,प्रा. व्ही. एच. पवार आदींसह दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तन्मय पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.