सनबर्नला मुद्रांक शुल्क बुडविल्याप्रकरणी नोटीस

20

पुणे– सनबर्न फेस्टिव्हलसाठी केसनंद येथील जागेचा ५ वर्षांसाठीचा करारनामा भाडेपट्टा म्हणून नोंदविणे आवश्यक असताना आयोजक पर्सेप्ट लाईव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने हा करारनामा भाडेकरार नोंदविला आहे. यासाठी ४२ लाख ९२ हजार ८५ रुपये मुद्रांक शुल्क कंपनीने भरणे आवश्यक असताना केवळ १२ हजार ५०० रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे. त्यामुळे मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल पारखे यांनी कंपनीला ४२ लाख ७९ हजार ५८५ रुपये भरण्याची नोटीस बजावली आहे.

पर्सेप्ट लाईव्ह प्रा. लि. या कंपनीने केसनंद येथील जागा पाच वर्षांसाठी भाडेकराराने घेतली आहे. या दस्ताची छाननी केली असता सदरचा दस्त भाडेपट्ट्याचा दस्त नोंदविणे आवश्यक आहे. या दस्तामध्ये मोबदला रक्कम २५ लाख रुपये नमूद करण्यात आली आहे. या कार्यालयाने या दस्ताचे मूल्यांकन १ अब्ज ४३ कोटी ६ लाख ९४ हजार २२३ रुपये निश्‍चित केले आहे. हा भाडेपट्टा पाच वर्षांचा असल्याने बाजारमूल्याच्या १० टक्के रक्कम रुपये १४ कोटी ३० लाख ६९ हजार ५०० रुपये इतके मुद्रांक शुल्क वसुलीसाठी ग्राह्य धरण्यात आले आहे. या दस्तऐवजावर ४२ लाख ९२ हजार ८५ रुपये इतके मुद्रांक शुल्क कंपनीने भरणे आवश्यक आहे. कंपनीने प्रत्यक्षात फक्त १२ हजार ५०० रुपयेच भरले असल्याने उर्वरित ४२ लाख ७९ हजार ५८५ रुपये भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

…तर आयोजकांवर होणार गुन्हा दाखल
राज्यात निष्पादित करण्यात असलेल्या दस्तांवर मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक आहे. मात्र, कंपनीने निष्पादित केलेले करारपत्र दस्त हे मुद्रांक केलेले नसल्यास मुद्रांक अधिनियमानुसार फौजदारी कारवाईस पात्र ठरत आहेत. तीन दिवसांत दस्त सादर न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच गुन्हा दाखल करण्याचा इशारा मुद्रांक जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या