संस्कृती सोहळा

468

गावाकडची जत्रा……..संपत मोरे, [email protected] com

आमच्या गावापासून चार मैलांवर सागरोबा मंदिर आहे. या सागरोबाच्या यात्रेला आम्ही लहानपणी जायचो. त्या काळात आमच्या गावातून जाणारा रस्ता मुरमाचा होता. त्या रस्त्यावर मोठय़ा वाहनाची रहदारी कमी होती. सागरोबाच्या यात्रेदिवशी मात्र या रस्त्यावरून लहान टेम्पो, सायकली आणि बैलगाडय़ांची वर्दळ असायची. आमचे आप्पा सकाळी लवकर उठून बैल धूत. त्यांची शिंगे रंगवत त्यांच्या शिंगाला रिबीन बांधत. गाडीत बसायला मोठं घोंगड अंथरत. आमची सगळ्यांची जेवणं झाली की गाडी जुंपून सागरोबाच्या दिशेनं आमचा प्रवास सुरू होई. या यात्रेसाठी माझा मावशा त्यांची मुलं, माझा दोस्त सत्या असे असत. रस्त्यावरून जाताना आम्हाला अनेक बैलगाडय़ा दिसत. त्याही आमच्या बैलगाडीसारख्या सजवलेल्या असत. काही वेळा एखादा खोडकर बैलगाडीवाला दुसऱया बैलगाडीवाल्याला शर्यतीचं आव्हान द्यायचा. दुसराही ते आव्हान स्वीकारायचा. मग रस्त्यावरून या दोन गाडय़ा फुफाटय़ातून उधळत. त्या गाडीत बसलेली बायका, लहान मुलं आरडाओरडा करत,पण ईर्षेला पेटलेले गाडीवाले गाडय़ा थांबवत नसत. चांगलं मैलभर गेल्यावर त्या गाडय़ा थांबत.त्या शर्यतीकडे इतर गाडीवाले गमतीने पहात काही ओरडून त्यांना प्रतिसाद देत ही शर्यत थांबल्यावर मात्र ते गाडीवाले गप्पा मारत वाट पार करत.

आमची बैलगाडी देवराष्ट्रे गावात गेल्यावर यात्रेची गर्दी दिसायला सुरुवात व्हायची. सागरोबाकडे जाणाऱया रस्त्यावर बघेल तिकडे माणसेच दिसायची. सागरोबाकडून येणारे आठ -दहा सायकलस्वार एका सुरात पो पो असा पिपाणीचा आवाज काढत सगळ्या लोकांचं लक्ष वेधून घेत. पिपाणीचे आवाज, माणसाची कलकल, गर्दीतून वाट काढताना भुजणारे बैल, बुजलेल्या बैलाच्या पाठीवर चाबकाचे फटकारे मारणारे गाडीवान आडव्या आलेल्या बैलगाडीला वैतागून जोराने हॉर्न वाजवणारे वाहनचालक असं चित्र दिसायचं. अलीकडच्या बाजूला असणाऱया मोकळ्या मैदानात बैलगाडय़ा सोडल्या जातात तिथून एक कोसावर सागरोबा होता. बैलगाडीतून उतरून जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाजीवाले, चहावाले छोटी खेळणी विकणारे काकडय़ा, पेरूवाले, सायकलीवरून गारेगार विकणारे यांची रेलचेल असे. ही सगळी माणसे येणाऱया जाणाऱयांना हाक मारत. मलाही वाटायचे भजी खावीत, मस्त गारेगारचा आस्वाद घ्यावा. मीठ टाकलेल्या पेरूची चव वेगळीच असते ती घ्यावी. खेळण्याच्या दुकानाजवळ थांबल्यावर शिट्टी घ्यावी, टॅक्ट्रर घ्यावा. मोटर घ्यावी असं वाटायचं, पण माझ्याकडे आजीने दिलेले पाच रुपये असायचे. त्याचा अंदाज घेतल्यावर हिरमोड व्हायचा. तरीबी वाटायचं किती मन मारायचं. पण मला आणि सत्याला गारेगारच्या दोन कांडय़ा घ्यायचो. पाच रुपयांचे चार रुपये झालेले असायचे. मग तोही भज्याची प्लेट मागवायचा. आता आम्ही यात्रेत रमलेले असायचो.

पुढं गेल्यावर पाळणं असायचं. पाळण्यात बसायला यात्रेकरूंची गर्दी झालेली असायची. खालचा पाळणे वर जाताना आणि वरचे पाळणे खाली येताना मजा वाटायची. पाळण्यात बसलेले लोक मोठय़ा उत्साहाने खाली उभे असलेल्या लोकांना हाका मारायचे हातवारे करायचे. पाळणा थांबल्यावर पाळण्यात बसलेले लोक बाजूला व्हायचे दुसरे बसायचे. आम्ही बराच वेळ ते बघत  असायचो.

त्यानंतर आम्ही नेमबाजीच्या दुकनाजवळ थांबायचो. एकाच्या हातात बंदूक होती. त्यांने बोर्डवर असलेल्या फुग्यावर नेम धरलेला होता. त्याच्या गोळीतून फुगा फुटला. त्यानं चारआणे काढून त्या उभ्या असलेल्या माणसाला दिले. बोर्डवर अनेक रंगांचे फुगे होते. तिथे फुगे फोडायला गर्दी झाली होती. अनेकदा नेम चुकायचा. आम्ही तासभर तिथे थांबलो. आम्ही बराचवेळ उभे आहोत हे पाहून फुगेवाला म्हणाला, ये पोरांनो, का उभा रहिलाय जावा. ‘मग आम्ही तिथून हाललो.

पुढ रस्त्यावर जादूचा प्रयोग सुरू होता. बूट, सूट टायवाला जादूगार कधी मराठीत तर कधी हिंदीत बोलत जादूचे प्रयोग दाखवत होता. त्यानं एका स्टूलवर कागदाचा जाळ केला. ती राख हाताने चोळली त्याचा भंडारा झाला. लोकांनी टाळ्या वाजविल्या. त्यानं पुन्हा एका दहा रुपयांच्या नोटेचे दोन दहाच्या नोटा केल्या.

आता आम्हा दोघांना भुका लागल्या होत्या. आम्ही गोडय़ा शेवेचे दुकान हुडकून काढलं. तिथं जाऊन गोडी शेव खाल्ली. नळाला जाऊन पाणी पिलो. पोट भरल्यावर आम्ही पुन्हा जत्रेत फिरायला मोकळे झालो.

आता सागरोबा मंदिरकडे गेलो. चोहोबाजूनी डोंगर.डोंगराच्या पायथ्याला छोटी छोटी मंदिरे सगळ्यात मोठे मंदिर सागरोबाचे. माणसांची गर्दी झालेली.

यात्रा फिरून कंटाळा आल्यावर आमची गाडी तळावर आली तिथं आमची वाट पाहत होते. आता शिरवाळ पडलेलं. आप्पांनी गाडी जुंपली. बैलाला दा…..असं म्हणताच गाडी सुटली. माझ्या मावशा बाजारात घेतलेल्या वस्तू एकमेकीला दाखवत होत्या. यात्रेची चर्चा करत आम्ही घरी आलो.

गेल्या काही दिवसांत माणदेशातील मलवडी गावच्या यात्रेला गेलो. या यात्रेत फिरलो. गेल्या काही वर्षांत यात्रा फिरण्याचा योग आलेला नव्हता. मलवडीत फिरताना लक्षात आलं यात्रा खूप बदलली आहे. जुन्या यात्रेत दिसणाऱया अनेक गोष्टी या यात्रेत बदलल्या आहेत किंवा दिसेनाशा झाल्या आहेत. सायकलीवरून येणारा गारेगारवाला आता मोटरसायकलवरून आला आहे. तो गारेगार विकत नाही तर चोकोबार विकतो आहे. या बदलाबाबत त्याला विचारलं तर तो म्हणाला, ‘गारेगारत लय कमी मार्जिन हाय. यात बरं पैसं मिलत्यात.’

एका ठिकाणी पाच नव्या दुचाकी गाडय़ा उभ्या होत्या. एका स्पीकरवरून लोकांना गाडय़ाची माहिती दिली जात होती. लोकांची त्या ठिकाणी गर्दी होती. येणाऱया प्रत्येक माणसाचा पत्ता, फोन नंबर लिहून घेतला जात होता. त्याला गाडी घेण्याबाबत आग्रह करण्यात येत होता. हे पहात असताना एक आवाज आला कोनतीही वस्तू घ्या दहा रुपये….त्या आवाजाच्या दिशेनं गेलो. एकजण वेगवेगळ्या वस्तू विकत बसलेला. बॅटरी, लोखंडी पाणे, छोटी कुलपे, ब्रश, मनगटी घडय़ाळय़ाचे पट्टे अशा जवळ जवळ पन्नासभर वस्तू होत्या. कोणतीही वस्तू दहा रुपयाला होती.

खेळण्याची दुकाने. आम्ही लहान असताना किल्लीवर चालणाऱया गाडीचे आम्हाला जास्त आकर्षण असायचे, पण त्या दुकानात रिमोटवर चालणारी गाडी होती. बोलणारी बाहुली होती. बटण दाबताच लोकप्रिय गाणं म्हणणारा मोबाईल अशी खेळणी होती. ही दुकाने मागे टाकून जात असतानाच एक तरुण काही जाहिराती वाटत होता. त्यानं माझ्याही हातात एक पत्रक दिलं ‘वजन कमी करा किंवा वाढवा’ असा मजकूर त्यात होता. खाली फोन नंबर दिलेला. एकूणच असं लक्षात आलं यात्रेच्या गर्दीकडे आता सगळ्यांचे लक्ष गेलंय. रस्त्याच्या कडेला डिजिटल पोस्टर लावलेले. त्यावर येणाऱया भाविकांचे स्वागत असा मजकूर होता, पण त्यावर आगामी जिल्हा परिषद निवडणुकांचे सावट होते. पालखीचा दिवस होता. पालखीच्या ठिकाणी गेलो. सदानंदाचा येळकोट घे….भाविक गजर करत होते. भंडारा उधळत होते. पालखीवर भंडारा, खोबरं उधळत होते. सगळीकडचा रस्ता पिवळाधमक झालेला. लोक एकमेकाला ढकलत निघाले होते….

ही बदललेली यात्रा पाहून आलो होतो. एक दिवस असाच निघालेलो तर मला बैलगाडीतून यात्रेहून परत घरी जाणारे आजी-आजोबा दिसले. गाडी उनातून चालली होती, पण आजी आजोबांच्या चेहऱयावर मरगळ नव्हती. आमची आजोबांशी चाललेली बातचीत आजी कौतुकाने बघत होती. ती बैलगाडी निघून गेली, पण जाताना भूतकाळात घेऊन गेली. माझ्या बालपणी कुंडल यात्रेतील कुस्त्या बघायला जाताना दादा आणि आप्पा दोघे मला बैलगाडीतून घेऊन जायचे, कुस्त्या दिवसभर असायच्या. कुस्त्या संपल्या की आम्ही लाड बापू यांच्या घरी जेवायचो. पुन्हा रात्री बार्ंडगपुढं जयवंत सावलजकर यांचा तमाशा असायचा. तमाशा सुटायला पहाटेचे चार वाजायचे. तमाशा सुटल्यावर आम्ही बैलगाडीकडे यायचो. गाडीत दादा आप्पाच्या जीवाभावाच्या गोष्टी सुरू व्हायच्या. कधी कुस्तीचा विषय तर कधी तमाशातील टुंग निघायची. ते ऐकतच मला झोप लागायची. वस्ती आल्यावर मला दादा जागे करायचे…या सगळ्या आठवणी डोळ्यांसमोर आल्या.

आज कुंडलची यात्रा बदलली आहे. या यात्रेला मला बोटाला धरून नेलेले दादा काळाच्या पडद्याआड गेलेत. आप्पाही थकलेत. आमच्याकडे आता बैलबी नाहीत. आप्पा अजूनही कुंडलच्या यात्रेला जातात. मी मात्र आता यात्रेपासून दूर आहे. माझ्या मनात मी लहानपणी अनुभवलेली यात्रा रुतून बसलेली आहे. ती तशीच राहावी.

 

आपली प्रतिक्रिया द्या