इन्शुरन्स पॉलिसीवर बोनसचे आमिष दाखवून घातला चार लाखांचा गंडा

सामना प्रतिनिधी, मुंबई

‘इन्शुरन्स कंपनीमधून बोलतोय, तुमच्या पॉलिसीवर बोनस आला असून तो हवा असेल तर काही पैसे भरावे लागतील’ असे सांगून मुलुंडमधील डॉक्टरला चार लाखांचा चुना लावणाऱ्या तिघांना मुलुंड पोलिसांनी अटक केली. राकेश शिंदे, रमेश उगले, मुरलीधर देशमुख अशी या तिघांची नावे असून त्यांनी अशाप्रकारे अनेकांना ठगविल्याचे समोर आले आहे.

‘भारती एक्सा लाइफ इन्शुरन्स कंपनी’तून बोलतोय असे सांगून एका इसमाने पॉलिसीवर बोनस लागल्याचे सांगितले. त्यासाठी विविध प्रकारचे टॅक्स आणि कागदी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पैसे भरावे लागतील असे सांगितले. विविध बँक खात्यांमध्ये आणि रोखीने सुमारे चार लाख दिल्यानंतर या इसमांनी मोबाईलवर कॉल घेण्याचे बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉ. राजशेखर उजगरे यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार केली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर गुन्हे पथकाचे पोलीस निरीक्षक वारके, सहायक पोलीस निरीक्षक पुरी, उपनिरीक्षक वडते यांनी सखोल तपास करून आरोपींचा शोध घेतला. याप्रकरणी राकेश, रमेश आणि मुरलीधर यांना अटक केली. त्यांच्याकडून सहा मोबाईल, १३ सीमकार्ड, पाच डेबिट कार्ड, ऑक्टिव्हा इत्यादी जप्त केले. विविध इन्शुरन्स कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे भासवून त्यांनी अशाप्रकारे अनेकांना फसविल्याचे उघड झाल्याचे मुलुंड पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या