खोट्या बातम्यांनी घाबरल्याने मजुरांनी केले गावाकडे पलायन, केंद्रीय गृह मंत्रालयाची माहिती

553

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. यामुळे उद्योगधंद्यांवर विपरीत परिणाम झाला आहे. लॉकडाऊनचा सगळ्यात मोठा फटका हा मजूर वर्गाला बसला होता. रोजीरोटी हिरावली जाण्यापासून घरी परतण्यापर्यंत त्यांना असंख्य अडचणींना तोंड द्यावं लागलं होतं. प्रमुख शहरात कामधंद्यासाठी आलेले हे मजूर गावी परतण्यासाठी पायी निघालेले देखील संपूर्ण देशाने पाहिले होते. मजुरांच्या या पलायनाला खोट्या बातम्या जबाबदार असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे. मंगळवारी लोकसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देत असताना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ही माहिती दिली आहे. राय म्हणाले की लॉकडाऊनचा कालावधी वाढवणार असल्याच्या बातम्यांमुळे हे मजूर घाबरले आणि त्यांनी पलायनाला सुरुवात केली. सरकारने लॉकडाऊन काळात गरजेच्या असलेल्या सगळ्या उपाययोजना केल्या आणि कोणताही नागरीक अन्न, पाणी आणि तपासणीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली असे राय म्हणाले.

लोकसभेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता की फक्त 4 तासांच्या कालावधीमध्ये संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा का करण्यात आली? यावर राय यांनी उत्तर देताना सांगितले की मोठ्या प्रमाणावर होणारी संभावित ये-जा थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. लोकांनी मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू केली असती तर कोरोनाचा फैलावही वेगाने झाला असता त्यासाठी हे पाऊल उचलावं लागल्याचं ते म्हणाले. लॉकडाऊनच्या काळात एक कोटींहून अधिक मजुरांनी आपल्या घरी पलायन केले. त्याची आकडेवारी सरकारने जाहीर केली आहे. सर्वाधिक मजूर हे उत्तर प्रदेश आणि बिहारचे असल्याचे समोर आले आहे. या आकडेवारीमुळे उत्तर प्रदेश आणि बिहार सारख्या राज्यात किती बेरोजगारी आहे हे स्पष्ट होत आहे.

कामगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोरोना काळात 1 कोटी 4 लाख 66 हजार 152 मजुरांनी पलायन करून आपले घर गाठले आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार 4 हजार 611 श्रमिक रेल्वेच्य माध्यमातून 63 लाख 7 हजार प्रवाशांना आपल्या घरी सोडण्यात आले. याचा अर्थ 41 लाख प्रवासी मजुरांनी पायी अथवा इतर साधनांनी आपले घर गाठले आहे. असे असले तरी या दरम्यान किती मजुरांचा मृत्यू झाला याची आकडेवारी सरकारकडे उपलब्ध नाही.

सर्वाधिक मजुर हे उत्तर प्रदेश आणि बिहारचे रहिवासी आहेत. त्यामुळे या राज्यात बेरोजगारीचे प्रमाण किती कमी आहे हे निदर्शनास आले आहे. सर्वाधिक मजूर उत्तर प्रदेशमध्ये परतले आहेत. त्यांची संख्या 32 लाख 49 हजार 638 इतकी आहे. तर बिहारमधून 15 लाख 612 मजूर बिहारमध्ये परतले आहेत. बिहारमधील सर्वाधिक मजूर हे मुंबई आणि दिल्ली सारख्या महानगरांत उदरनिर्वासाठी स्थलांतरित झाले होते. पश्चिम बंगालमध्ये 13 लाख 84 हजार 693 मजूर परतले आहेत. तर राजस्थानमध्ये 13 लाख 8 हजार 130 मजूर परतले आहेत. तर मध्यप्रदेशमध्ये 7 लाख 53 हजार 581 मजूर परतले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या