नगरमधील सुरभी हॉस्पिटलचा ना हरकत दाखला बनावट

छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील हॉटेल महाराजाजवळ उभारण्यात आलेल्या सुरभी हॉस्पिटलच्या बांधकाम परवानगीसाठी मनपा नगर रचना विभागाला दिलेला संरक्षण विभागाचा ना-हरकत दाखला खरा नाही, असा स्पष्ट अहवाल मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी दिला आहे. अतिरिक्त आयुक्तांनी 24 नोव्हेंबर 2022 रोजी दिलेल्या या अहवालाच्या आधारे मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याकडून मागील चार महिन्यांपासून कारवाई होत नसल्याने शाकीर शेख यांनी आयुक्त डॉ. जावळे यांची शासनाकडे तक्रार केली असून, शासनाने या तक्रारीच्या अनुषंगाने डॉ. जावळेंकडून अहवाल मागवला आहे.

नगर शहरातील सावेडीमधील प्लॉटवर बांधकाम परवानगीसाठी भूखंडधारक सय्यद जहागीरदार यांनी मनपाकडे अर्ज केला होता. ऑनलाइन नगर विभागाचे उपविभागीय अधिकारी यांच्या पत्रासमवेत संरक्षण विभागाची बांधकाम ना-हरकत (एनओसी) दाखल केली होती. यादरम्यान, तक्रारदार शाकीर शेख यांनी उपविभागीय कार्यालयाकडे संबंधित ना-हरकत दाखल्याची प्रत मागितली होती. मात्र, संबंधित ना-हरकत दाखला त्यांनी दिलेला नसल्याचे स्पष्ट केल्याने त्याबाबत शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली होती व न्यायालयाच्या आदेशाने पोलीस उपअधीक्षकांनी शेख यांचा जबाब नोंदवला होता आणि मनपाला पत्र पाठवून संबंधित ना-हरकत दाखल्याची खात्री करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याचे कळवले होते.

पोलिसांनी पत्र पाठवूनही डॉ. जावळे यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याने शेख यांनी अतिरिक्त आयुक्त डॉ. पठारेंकडे तक्रार केली होती. संबंधित बांधकाम परवानगीसमवेत दाखल करण्यात आलेला संरक्षण विभागाचा ना-हरकत दाखला खरा नसल्याचे स्पष्टीकरण डॉ. पठारे यांनी त्यांच्या चौकशी अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे. याप्रकरणी शासनाने मनपा आयुक्त डॉ. जावळे यांच्याकडून अहवाल मागवला आहे.

न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार

 मनपा अतिरिक्त आयुक्त डॉ. पठारे यांनी दिलेल्या अहवालानुसार मनपा आयुक्त डॉ. जावळे व नगर रचना विभागाच्या सहायक संचालकांद्वारे आवश्यक फौजदारी स्वरुपाची कारवाई होत नसल्याने याबाबत छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीच्यावेळी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली जाणार असल्याचे तक्रारदार शेख यांनी सांगितले. त्यांनी दाखल केलेल्या या याचिकेची सुनावणी आता येत्या 12 एप्रिलला होणार आहे.