नव्या नोटांसंदर्भात मोदी सरकारचे दावेही बनावट निघाले

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

नोटाबंदीनंतर चलनात आणलेल्या नवीन नोटा या अत्यंत सुरक्षित आहेत, ५००,२००० च्या बनावट नोटा बनवणं अत्यंत कठीण आहे असं छातीठोकपणे सांगणाऱ्या सगळ्या मंडळींचा पोपट करत पाकिस्तानने २ हजार रूपयांच्या नकली नोटा बनवून त्या चलनात आणण्यासाठी धडपड सुरू केलीय.

नोटाबंदीचा निर्णय नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आला. त्यानंतर अवघ्या चार महिन्यातच २००० रूपयांच्या बनावट नोटा तयार करण्यात आल्याने याही नोटा किती असुरक्षित आहेत, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरूण जेटली,रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल, अर्थमंत्रालयाचे अधिकारी या सगळ्यांचे दावे किती खोटे आणि तकलादू आहेत हे सिद्ध झालं. पाकिस्तानने बनावट नोटा हिंदुस्थान आणि बांग्लादेशच्या सीमेवरून हिंदुस्थानात आणण्याचे प्रयत्न सुरू केलेत. इंडीयन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राला सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर ही बातमी प्रसारीत करण्यात आली आहे.

८ फेब्रुवारीला मुर्शिदाबाद इथे पश्चिम बंगालच्या अझिजूर रेहमानला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे २ हजार रूपयांच्या ४० बनावट नोटा सापडल्या. या नोटा पाकिस्तानात छापल्याचं त्याने चौकशीत सांगितलं. विशेष म्हणजे यात पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा मोठा हात असल्याचंही त्याने सांगितलंय. २००० च्या नव्या नोटेत सुरक्षेसाठी आणि असली नोट ओळखण्यासाठी १७ खुणा आहेत, त्यातल्या ११ खुणा हुबेहूब बनावट नोटांमध्ये बघायला मिळत आहेत. ज्यामध्ये वॉटरमार्कचाही समावेश आहे. बनावट नोटेचा कागद हा हलक्या दर्जाचा आहे, ही बाब सोडली तर बनावट नोट ओळखणं हे अत्यंत मुश्कील आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या