‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर तृप्ती देसाई संतापल्या, केली कारवाईची मागणी

23587

>>शीतल धनवडे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन च्या काळात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई या दारू घेताना सापडल्याचा आणि त्यांना पोलीस पकडून घेऊन जात असल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियातून वायरल होऊ लागले आहेत. त्यामुळे यावरून सर्वत्र उलट-सुलट चर्चा होत असतानाच, यामागचा खरा प्रकार खुद्द तृप्ती देसाई यांनीच दैनिक सामनाशी बोलताना उघड केला आहे.

तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जनादेश यात्रा वेळी दारुबंदीसाठी त्यांना मोकळ्या दारुच्या बाटल्यांचा हार घालण्याचे आंदोलन करताना, पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पण सध्या या आंदोलनाचे असे फेक व्हिडिओ बनवून समाजाची जाणीवपूर्वक दिशाभूल करण्यात येत आहे.तसेच यातून महिलांचा अवमान करणा-याचाही शोध घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी देसाई यांच्या कडून करण्यात आली आहे.

दारुबंदी करावी यासाठी भूमाता ब्रिगेडच्या वतीने तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अनेकवेळा मागणी करण्यात आली. पण त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने,जनादेश यात्रेत फडणवीस यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला होता. त्यानुसार पुणे येथे आलेल्या जनादेश यात्रेत फडणवीस यांना मोकळ्या दारुच्या बाटल्यांचा हार घालण्याची तयारी सुरू असतानाच,एका दुकानातून तृप्ती देसाई यांना या बाटल्यांसह पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्या आंदोलनातील प्रसंगाचे व्हिडिओ सध्या लाॅकडाऊन काळात तृप्ती देसाई दारु घेताना सापडल्या म्हणून अधिक व्हायरल होत आहेत. आपल्या विरोधात जाणीवपूर्वक हो खोडसाळपणा करण्यात आला आहे.यातुन समाजाची दिशाभूल करण्यासह समाजसेवा चळवळीतील महिलांचाही अवमान करण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून करण्यात येत आहे. कोरोनाच्या कठीण प्रसंगी देश संकटात असताना आणि प्रशासन व्यस्त असताना सोशल मीडियाचा अशाप्रकारे गैरवापर करणा-यांवर गृहमंत्र्यांनी सायबर सेल च्या माध्यमातून शोध घेऊन कडक कारवाई करावी अशी मागणी तृप्ती देसाई यांनी दैनिक सामनाशी बोलताना व्यक्त केली. यासंदर्भात सायबर सेल मध्ये आपण गुन्हा दाखल करणार असून, गृहमंत्र्यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या