
नाफेडने बाजार समित्यांमध्येच खरेदी करण्याची मागणी
चांगल्या प्रतीच्या कांद्याला दीड ते दोन हजार रुपये प्रतीक्विंटल भाव मिळाल्याने गुरुवारी जिल्ह्यात शेतकरी संतप्त झाले. चार हजार रुपये हमीभाव मिळावा, नाफेडने बाजार समितीत येवून कांदा खरेदी करावा, अशी मागणी करीत लासलगाव, येवला, पिंपळगाव बसवंत, चांदवड, उमराणे येथे शेतकऱयांनी लिलाव बंद पाडले. चांदवड येथे महाविकास आघाडीने महामार्ग रोखला. लासलगावमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह शेतकरी संघटनांनी ठिय्या आंदोलन केले.
केंद्राने निर्यात शुल्कात वाढ करीत भाव पाडण्याचे धोरण अंगिकारल्याने शेतकरी आक्रमक झाले. या निर्णयाचा मोठा फटका बसणार असल्याने व्यापाऱयांनी सोमवारपासून लिलावात सहभाग घेण्यास नकार दिला होता. केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्या मध्यस्तीनंतर आजपासून व्यापाऱयांनी लिलाव सुरू केले. सकाळच्या सत्रात अनेक ठिकाणी चांगल्या प्रतीच्या कांद्याला दीड ते दोन हजार रुपये भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले. ठराविक ठिकाणी 2300 ते 2500 रुपये प्रतीक्विंटल पुकारला गेला. चार हजार रुपये भाव मिळावा, अशी आग्रही मागणी शेतकरी संघटनांनी सोमवारपासूनच केली. त्यातुलनेत हे दर कमी असल्याने काही वाहनांचा लिलाव होताच त्यांनी प्रक्रिया बंद पाडली. त्यामुळे सकाळच्या सत्रात लासलगाव, पिंपळगाव, उमराणे, चांदवड आणि येवला येथे लिलाव ठप्प झाले.