रिषभ, वारंवार असे  बाद होणे ठीक नाही! ‘लिटल मास्टर’ गावसकर यांनी टोचले पंतचे कान

रिषभ तुझ्यात मोठी खेळी करण्याची अफाट क्षमता आहे, तुझ्याकडे चांगल्या फटक्यांची शिदोरी आहे. पण वारंवार तू ऑफ स्टम्पबाहेरचे चेंडू टोलवायला जाऊन नाहक तुझी विकेट गमावतोस. हे काही चांगले लक्षण नाही, अशा शब्दांत माजी कर्णधार आणि क्रिकेट समालोचक ‘लिटल मास्टर’ सुनील गावसकर यांनी टीम इंडियाचा यष्टिरक्षक आणि धडाकेबाज फलंदाज रिषभ पंत याचे कान टोचले आहेत.

… तर ते चेंडू वाईड ठरले असते

दक्षिण  आफ्रिकेच्या गोलंदाजांनी पंतविरुद्ध विशेष रणनीती आखल्याचे सांगून गावसकर  म्हणाले, ‘ऑफ स्टम्पबाहेर चेंडू टाका आणि पंतला बाद करा,’ असा त्यांचा अजेंडा आहे. पंतने या मालिकेत 29, 5, 6 आणि 17 धावा केल्या. यंदा टी-20 सामन्यात पंत किमान दहावेळा अशा पद्धतीने बाद झाला. त्याने असे चेंडू छेडले नसते तर त्यातील काही चेंडू वाईड ठरले असते. चेंडू फार बाहेर असल्याने तो टोलवायला अतिरिक्त ताकद लागते.  हिंदुस्थानी  कर्णधार एका मालिकेत सातत्याने एकसारखा बाद होत असेल तर हे चांगले संकेत ठरणार नाहीत, असेही नाराजीचे सूर गावसकर यांनी काढले.