दोन्ही पाय गमावलेल्या पिल्लाला कुलकर्णी दाम्पत्याने दिला ‘आधार’

34

सामना ऑनलाईन,संभाजीनगर

अडीच महिन्यांचे कुत्र्याचे पिल्लू खेळत-खेळत थेट रस्त्यावर पोहचले. भरघाव येणाऱ्या दुचाकीस्वाराने या पिल्लाच्या थेट कंबरेवरूनच दुचाकी नेली.या अपघातात या पिल्लाच्या कंबरेपासूनचा भाग निकामी झाल्याने त्या पिलाचे दोन्ही पाय निकामी झाले. या पिल्लाची यातना बघून हळहळणाऱ्या कुलकर्णी दाम्पत्याने  ‘आधार’ दिला, त्यांच्या आधारामुळे हे पिल्लू आज पुन्हा धावायला लागले आहे.

सिडको भागात डॉ. गणेश कुलकर्णी यांच्याकडे असलेल्या कुत्रीने ५ पिल्लांना जन्म दिला. काही दिवसांतच ही पिल्ले बागडायला लागली. दिवसभर खेळ आणि मस्तीमुळे बच्चे कंपनीचेही मनोरंजन होत होते. एक दिवस यातील एक पिल्लू खेळत खेळत नकळत रस्त्यावर पोहचले. यावेळी एका भरधाव दुचाकीस्वाराने या पिल्लाच्या कंबरेवरून दुचाकी नेली. यामुळे या पिलाचा कंबरेपासूनचा भाग निकामी झाला. अपघातात जखमी झाल्याने प्रचंड वेदना आणि रक्तस्त्रावामुळे हे पिलू रात्रभर रस्त्यावर विव्हळत होते. या रस्त्याने जाणाऱ्या एकालाही या पिल्लाला मदत करावी असं वाटलं नाही. डॉ.कुलकर्णी घरात पाचवं पिल्लू दिसत नसल्याने घरातील लहान मुलांसह त्याला शोधायला बाहेर निघाले. शोधाशोधीचा दुसरा दिवस उजाडल्यानंतर त्यांना हे पिलू रस्त्यालगत विव्हळत असल्याचे दिसलं.

डॉ.कुलकर्णींनी या पिल्लाला तातडीने श्वानांसाठीच्या डॉक्टरकडे नेले, मात्र पाठीवरून बाईक गेल्याने त्याचे दोन्ही पाय निकामी झाले होते. या पिल्लाला घरी आणल्यानंतर इतर बागडणाऱ्या त्याच्या साथीदारांसोबत हे पिल्लू सरपटत जाऊन खेळण्याचा प्रयत्न करत होतं. मात्र पायावर उभं राहता येत नसल्याने पिल्लू अयशस्वी होत होतं. पिल्लाची ही अवस्था न बघवल्याने डॉ.कुलकर्णींनी पांगुळगाड्यासारखा एक स्टँड बनवायचं ठरवलं. फायबरचे छोटे स्टॅण्ड तयार करून आणि त्याला चाकं लावून या पिल्लाचा कंबरेपासूनचा निकामी झालेला भाग त्यांनी या स्टॅण्डवर ठेवला. या स्टँडमुळे पिल्लाला पुन्हा पूर्वीसारखं धावता यायला लागलं. आता हे पिल्लू त्याच्या चार साथीदारांबरोबर पुन्हा पहिल्यासारखे बागडायला लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या