भजन गायक नरेंद्र चंचल यांचे निधन

प्रसिद्ध भजन गायक नरेंद्र चंचल यांचे निधन झाले आहे. ते 80 वर्षांचे होते. गेल्या तीन महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांना उपचारांसाठी दिल्ली येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

प्रसिद्ध गायक दलेर मेहेंदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून नरेंद्र यांच्या निधनाची माहिती दिली आहे. ‘गायक नरेंद्र चंचल यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला दु:ख झालं’ असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

नरेंद्र यांची हिंदी चित्रपटसृष्टीतील कारकिर्द ही दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांच्यासोबत सुरू झाली होती. त्यांनी ‘बॉबी’ चित्रपटातील ‘बेशक मंदिर मस्जिद तोडो’ हे गाणे गायले होते.

त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमधील गाणी गायली आहेत. पण त्यांना ‘अवतार’ या चित्रपटात गायलेल्या ‘चलो बुलावा आया है’ या भजनाने खरी ओळख मिळवून दिली. काही दिवसांपूर्वी त्यांनी करोना व्हायरसवर देखील एक गाणे गायले होते आणि हे गाणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या