प्रसिद्ध क्रिकेट पंच रुडी कोएर्टजन यांचे अपघाती निधन, क्रिकेट जगतात शोककळा

दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेट पंच रुडी कोएर्टजन यांचं एका रस्ते अपघातात निधन झालं आहे. ते 73 वर्षांचे होते. आपल्या गाडीतून घरी परतत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला.

मंगळवारी सकाळी ही भीषण घटना घडली. स्थानिक वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी सकाळी रुडी हे केप टाऊनमधून आपल्या गाडीने नेल्सन मंडेला बे येथील आपल्या घरी जात होते. वाटेत रिवर्सडेल परिसरात समोरून येणाऱ्या एका वाहनाशी त्यांच्या गाडीशी टक्कर झाली. या अपघातात रुडी आणि अन्य दोन जणांचा मृत्यू झाला.

रुडी यांचं नाव क्रिकेट जगतातल्या मान्यवर आणि सर्वोत्तम पंचांमध्ये घेतलं जातं. रुडी बरीच वर्षं आयसीसीच्या वरिष्ठ पंचांच्या पथकाचा महत्त्वाचा भाग होते. त्यामुळे क्रिकेटजगतात त्यांच्या अपघाती निधनाने शोककळा पसरली आहे. रुडी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ पुढील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात दंडाला काळी पट्टी बांधून उतरणार आहे.