सारंगखेड्याच्या प्रसिद्ध घोडेबाजाराला सुरुवात

172

सामना ऑनलाईन। नंदूरबार

दत्तजयंतीच्या दिवशी नंदुरबारजवळ असलेल्या सारंगखेडा अश्व यात्रेला सुरूवात झाली आहे. इथल्या दत्तमंदिराचे वैशिष्ट्य हे आहे की हे मंदिर ३०० वर्ष जुनं असून इथे दत्तगुरूंची दुर्मिळ अशी एकमुखी मूर्ती बघायला मिळते. इथला घोडेबाजार हा देखील ३०० वर्ष जुना असल्याचं सांगण्यात येतं. राजस्थानमधील पुष्करनंतरचा हा दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा घोडेबाजार आहे.

पांढऱ्याशुभ्र घोड्यांसाठी या बाजाराने नावलौकीक मिळवलेला आहे. या घोडे बाजारात पंजाब, हरियाणा, कच्छ ,काठीयावाड, उत्तर प्रदेश या भागातील मोठे घोडे व्यापारी आणि अश्व शौकीन आपले घोडे घेऊन येतात. इथल्या उमद्या आणि जातिवंत घोड्यांची किंमत ही महागड्या गाड्यांपेक्षाही जास्त असते.

५० हजारापासून २१ लाख रूपयांपर्यंतचे घोडे इथे उपलब्ध असतात. स्पोर्ट्सकारच्या शौकिनांच्या जमान्यात आजही हा घोडेबाजार आपलं अस्तित्व आणि रूबाब टिकवून आहे ही विशेष बाब म्हणावी लागेल. त्यामुळेच इथे सिनेकलावंतही आवर्जून येत असतात. इथला दत्तजयंतीचा उत्सव १५ दिवस चालतो आणि या १५ दिवसात या घोडेबाजारात जवळपास ४ हजार घोड्यांची खरेदीविक्री होते.

आपली प्रतिक्रिया द्या