लकी अलीच्या निधनाची अफवा

गेली काही वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीसाठी ही नामवंत कलाकारांच्या निधनामुळे नकोशी वाटणारी ठरली आहेत. कोरोनानेही काही कलाकारांना आपले लक्ष्य करत हिरावून घेतले. अशातच गायक लकी अलीच्या निधनाची चर्चा सोशल मीडियावर व्हायला लागली. एकेकाळी प्रसिद्धीच्या शिखरावर असलेला हा गायक हल्ली प्रसिद्धीच्या झोतापासून लांब आपल्या कुटुंबासह राहातो आहे. त्याच्या निधनाच्या चर्चेची हळूहळू अफवा बनली आणि वाऱ्यासारखी पसरायला लागली. अफवेचे हे ढग दूर करण्यासाठी लकी अलीची मैत्रीण नफीसा अली सरसावली असून तिने लकी अली हा व्यवस्थित असून त्याला काहीही झालं नसल्याचं सांगितलंय.

नफिसाने एका ट्विटमध्ये म्हटलंय की ‘मी दुपारीच त्याच्याशी बोलले असून तो व्यवस्थित आहे. त्याला कोरोना झाला नसून तो आपल्या कुटुंबासोबत आपल्या फार्म हाऊसवर राहतोय’

नफिसाने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हटलं की ती लकी अलीशी दिवसातून 2-3 वेळा फोनवरून बोलली होती. लकी अलीला कोरोना झाला नसून त्याच्या शरिरात अँटीबॉडीज आहेत. नफिसा आणि लकी अली मिळून ऑनलाईन कॉन्सर्टचं प्लँनिंग करत आहेत.

हिंदुस्थानातील सर्वाधिक लोकप्रिय गायकांपैकी एक म्हणून लकी अली ओळखला जातो. सध्या सोशल मीडियावर त्याच्या एका गाण्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 90च्या दशकात त्याने ‘ओ सनम’, ‘आ भी जा’ आणि ‘इक पल का जीना’ यासारखे अनेक सुपरहिट गाणी गायली होती. ही गाणी आजही त्याचे चाहते आवडीने ऐकतात.

लकी अली याचा गोव्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो ‘ओ सनम’ हे गाणं गाताना दिसत आहे. हा व्हिडीओ अभिनेत्री नफीसा अली हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला.

या व्हिडीओत लकी अली गाणं गाताना गिटारही वाजवताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत नफीसा अलीने लिहिलं आहे की, ‘ ‘लकी अली स्वप्नांच्या बागांमध्ये राहतो.’

आपली प्रतिक्रिया द्या