सुलोचनादीदींना दादासाहेब फाळके सन्मान कधी?, चाहत्यांचा सवाल

74

सामना प्रतिनिधी । मुंबई

कधी सोशिक आई, कधी सालस बहीण तर कधी समजूतदार वहिनी बनून जिने रुपेरी पडदा जिंकला. मातृत्व जिच्या ‘सुलोचनां’तून बोलत राहिले, अशा ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी उद्या सोमवार, ३० जुलै रोजी वयाच्या नव्वदीत पर्दापण करीत आहेत. हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीच्या १०५ वर्षांच्या इतिहासाचा सुलोचनादीदी केवळ साक्षीदार बनून नव्हे तर एक भाग बनून राहिल्या. ही चित्रमाऊली दादासाहेब फाळके पुरस्काराच्या सर्वोच्च सन्मानापासून वंचित आहे. दीदींना यंदा तरी हा सर्वोच्च सन्मान मिळणार का, असा सवाल सिनेरसिक सरकारला करीत आहेत.

कृष्णधवल चित्रपटांच्या जमान्यापासून अगदी ऐंशीच्या दशकापर्यंत मराठी आणि हिंदी पडद्यावर झळकणारे मराठमोळे नाव म्हणजे सुलोचनादीदी लाटकर. पडद्यावर अनेक सुपरस्टार्सची आई. त्या अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, मनोजकुमार यांच्यापासून रमेश देव, महेश कोठारे, सचिन पिळगावकर अशा अनेकांच्या आई बनल्या. त्यांच्या नावाचा आणि कामगिरीचा उल्लेख केल्याशिवाय चित्रसृष्टीची शतकोत्तर वाटचाल अधुरीच आहे. त्यांना ‘पद्मश्री’, ‘महाराष्ट्र भूषण’ हे सन्मान मिळाले आहेत. मात्र चित्रपटसृष्टीतील भरीव योगदानाबद्दल केंद्र सरकारतर्फे देण्यात येणारा दादासाहेब फाळके हा सन्मान त्यांना मिळालेला नाही. त्यांच्या नव्वदीचे आणि इंडस्ट्रीतील अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सरकारने फाळके सन्मान त्यांना घोषित करावा, अशी प्रतिक्रिया त्यांचे चाहते आणि इंडस्ट्रीतून उमटत आहे.

संघटित प्रयत्न केले पाहिजेत

-रमेश देव ज्येष्ठ अभिनेते

सुलोचनादीदींसोबत काम केलंय. दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना मिळाला पाहिजे. आपल्याकडे लोकांची एकी नाही. बंगाली वा काही अन्य भाषिकांना पुरस्कार पटापट मिळतात. अर्थात त्यांच्या कलाकारांची तेवढी योग्यता असते ते मी नाकारत नाही. आपल्याकडे संघटित प्रयत्न होताना दिसत नाहीत. इंडस्ट्रीत इतके मोठे योगदान दिलेल्या लोकांच्या मागे उभे राहिले पाहिजे. काही गोष्टींचा पिच्छा पुरवल्याशिवाय काम होत नाहीत.

केवढी ही दिरंगाई, हे दुर्दैवच

-अशोक सराफ अभिनेते

सुलोचनादीदींना फाळके पुरस्कार न देणाऱ्यांचे मी अभिनंदनच करेन. केवढी ही दिरंगाई, मी तर म्हणेन अक्षम्य चूक आहे. ज्या व्यक्तीचे फिल्म इंडस्ट्रीत ७५ वर्षांचे योगदान आहे तिला हा सन्मान मिळत नसेल तर दुर्दैवच आहे. फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर अवघ्या देशाला त्यांचे कर्तृत्व माहिती आहे. न मागताही गोष्ट त्यांना मिळाली पाहिजे. कुणीतरी नाव सुचवणार, मग विचार होणार, मग प्रयत्न होणार याला काहीच अर्थ नाही.

दखल याआधीच घ्यायला हवी होती

-सचिन पिळगावकर अभिनेते

खरंच खूप उशीर झालाय. दीदींची इंडस्ट्रीतील ७५ वर्षे पूर्ण होण्याची वाट बघण्याची गरज नाही. त्यांचे नुसते नाव ऐकले तरी मनात आदरभाव निर्माण होतो. सुलोचनादीदींना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळावा यासाठी आम्ही गेल्या सहा वर्षांपासून मागे लागलोय. आता जी मंडळी कार्यरत आहेत त्यांना जुन्या मंडळींच्या योगदानाविषयी फार माहीत नाही. मी त्यांना दोष देत नाही. खरं तर त्यांचे हे क्षेत्र नाही. दीदींहून कितीतरी ज्युनियर लोकांना हा पुरस्कार मिळालाय. आपण प्रयत्नांत कुठेतरी कमी पडतोय.

आपली प्रतिक्रिया द्या