आगळीवेगळी धारावी

48

लोकसंस्कृति— गणेश चंदनशिवे [email protected]

औद्योगिक पार्श्वभूमी असलेल्या धारावीत उत्सवही मोठय़ा थाटात साजरे होतात. याचं श्रेय जातं इथल्या स्थानिक लोकांना.

आशिया खंडातील सर्वाधिक मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱया धारावीत सर्वाधिक प्रमाणात दोनच वर्ग नांदताना दिसतात ते म्हणजे हिंदू आणि मुस्लिम. परिणामी धारावीत गणेशोत्सव आणि ईद हे सण मोठय़ा प्रमाणात साजरे होतात.  गणेशोत्सवातही दोन विशेष गणपती असे आहेत, जे आजही पारंपरिकपणे गणपती आणतात व नेतात. एक आहे महाराष्ट्रातली संस्कृती जपणारा, तर दुसरा दक्षिणेतील संस्कृती जपणारा. आजही या गणपतीमुळे फक्त लेझीम-दांडपट्टय़ाचे खेळ केले जातात व शांततेत मिरवणूक काढली जाते तर दक्षिणेकडचे लोक त्याही गणपतीत पारंपरिक वाद्य वाजवून शांतता भंग होऊ न देता मिरवणूक काढतात. या क्षणी दोन्ही गणपतीच्या पुढे भाविकांची अलोट गर्दी असते…

त्याचप्रमाणे धारावी चमकते ती ईदच्या निमित्ताने हिंदू-मुस्लिम दोन्ही बांधव दर्ग्यात जातात. शाŒााsक्त पद्धतीने नमाज पढले जातात. दोन्ही समाज एकमेकांच्या शेजारी नांदतात, पण त्यांची ऐक्याची भावना आपल्याला खूप काही शिकवून जाते. ईदच्या दिवशी शिरकुर्मा आणि मटणाची थाळी हिंदूंच्या घरात येते, तर दिवाळीला फराळानं भरलेलं ताट त्यांच्याकडे जाते.

धारावीतले हे मूळ रहिवासी हे कोळी बांधवच. खाडीमध्ये भर घालून निर्माण झालेली ही धारावी. घाटेश्वरांच्या प्राचीन मंदिरावरून या उद्यानाचं नाव झालं धारावी. आज धारावीत मराठी वर्णामध्ये पूर्वाश्रमीचा चांभार व ढोर समाज मोठय़ा प्रमाणात कोळी बांधवांसोबत दिसतो.

धारावीत अगदी सोलापूरच्या सीमेवरून ते पुढे गुलबर्गा बदामी आणि मग कर्नाटक प्रांतातील कामांठी तुळू लोकांच्या तामीळनाडू आणि केरळमधील तमीळ व मल्ल्याळी लोकांचाही वावर मोठा दिसतो. यामध्ये सर्वात मोठा सण असतो तो ‘पोंगल’. धारावीतल्या रस्त्यारस्त्यावर त्याच्या पूजा मांडलेल्या दिसतात. यात बनवला जाणारा ‘पोंगल’ हा पदार्थ शेजाऱया पाजाऱयांपासून ते घरोघरी वाटला जातो.

विशेष म्हणजे दक्षिणेकडील लोकांचे आराध्य दैवत असणाऱया ‘श्री स्वामी आयप्पा’ या दैवताची येथे मोठय़ा प्रमाणामध्ये उपासना केली जाते. डिसेंबर-जानेवारी या महिन्यांमध्ये लाखोंच्या संख्येत अन्नदान करून उत्सव केला जातो. ज्याप्रमाणे दक्षिणेत रथयात्रा निघते त्याचप्रमाणे येथेही अय्यप्पा स्वामीची रथयात्रा निघते. त्या यात्रेमध्ये अंगावर वजनदार मनोरे घालून भरतनाटय़म करणारे लोक तेथील पारंपरिक कलाप्रकार सादर करत. दाक्षिणात्य प्रकारच्या सनई व ढोलाच्या तालात ही यात्रा संपन्न होते.

मराठी माणसाच्या परंपरेत इथे दोन उत्सव प्रामुख्याने पार पडतात. त्यात आषाढीतल्या आखाड उत्सव व चैत्रातील ज्योतिबायात्रा. आषाढात येथे घरोघरी देवदेवतांची पूजाअर्चा  केली जाते. धारावीच्या कुशीत आत देवबावडीत एक छोटं मंदिर आहे. हे मंदिर जागृत असल्याचे भाविक सांगतात. त्यांची प्रचिती व अनुभवही ऐकायला मिळतात. या ठिकाणी हनुमान जयंतीच्या दुसऱया दिवशी कोल्हापुरातल्या मूळ ढाणाप्रमाणेच धारावीत जत्रा भरते.

धारावीत अंगात येणे, देव देवस्थळी करणे असे प्रकार समाजाकडे एकवटलेले असल्याने मराठी वर्गात असे प्रकार येथे पाहायला मिळतात. नवरात्रीतही इथे उपासक, आराध्याचे पारंपरिक कार्यक्रम होतात. काही गोष्टी अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱया आहेत, परंतु त्यात बदल घडायला व लोकांची मानसिकता बदलायला हवी. धारावीत किती समाज, किती जाती, किती धर्म नांदतात हा तसा अभ्यासाचा विषय आहे. पण प्रत्येक सण, उत्सव  त्याच उत्साहाने पार पडतो आणि त्याचं श्रेय जातं ते… ऐक्याला कदाचित धारावीतील हा ऐक्यभाव, ही जगण्याची पद्धत हीच त्यांची खरी ‘जत्रा’ असावी, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या