जर्मनीत सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न, 3 हजार पोलिसांचे 130 ठिकाणी संयुक्त ऑपरेशन

कट्टर उजव्या विचारसरणीच्या मंडळींनी एकत्र येत जर्मनीतील सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांची कुणकुण लागल्याने पोलिसांनी संपूर्ण जर्मनीत एका मोठ्या धाडसत्राला सुरुवात केली. जवळपास 3 हजार पोलीस कर्मचाऱ्यांनी 130 ठिकाणी छापेमारी करत हा कट उधळून लावलाय. सत्ता उलथवणाऱ्यांना सरकार पाडून त्याजागी स्वघोषित राजपुत्र ‘हेन्रीच’ 13वा याला सत्तेवर बसवायचं होतं.

जागतिक महायुद्धानंतर जर्मनीत बरीच राजकीय उलथापालथ झाली आणि लोकनियुक्त सरकार सत्तेवर आलं. मात्र लोकनियुक्त सरकार ही संकल्पना ‘राईख नागरीक चळवळी’ला मान्य नव्हती. घटनेने सत्तेवर आलेलं सरकार पाडणं गरजेचं आहे असा त्यांनी निर्धार केला होता. या गटाची काही मंडळी आणि माजी लष्करी अधिकारी यांनी मिळून सत्ता उलथवून टाकण्यासाठी एक कट रचला होता. काहीही करून राईखस्टॅग या जर्मनीतील संसदेत घुसायचे असं त्यांनी ठरवलं होतं.

जर्मनीतील 16 राज्यांमधल्या 11 ठिकाणी या कटासाठीच्या हालचाली सुरू होत्या. या सगळ्या जागांवर पोलिसांनी छापा मारला असून 22 जणांना दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे. या गटाला मदत करणाऱ्यांमध्ये एका रशियन नागरिकाचाही समावेश आहे. बुंडेनस्टॅग नावाचा एक माजी खासदार हा देखील सत्ता उलथवून टाकण्यासाठीच्या कटात सामील होता असा पोलिसांनी दावा केला आहे. पोलिसांनी केलेल्या छापेमारी दरम्यान KSK नावाच्या जर्मनी सैन्य दलाच्या विशेष प्रशिक्षित तुकडीच्या बरॅकवरही छापा मारण्यात आला आहे. या तुकडीमध्ये कट्टर उजव्या विचारसरणीचे सैनिक असल्याचा यापूर्वीही आरोप करण्यात आला होता.