‘मोदीजींच्या भेटी दरम्यान शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करा’, टिकैत यांचे बायडेन यांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी विराजमान असलेल्या हिंदुस्थानी वंशाच्या कमला हॅरिस यांची भेट घेतली आहे. यावेळी मोदी यांनी हॅरिस यांचं अभिनंदन केलं आहे. या पदासाठी झालेली त्यांच्या नावाची निवड ही अत्यंत महत्वाची आणि ऐतिहासिक घटना असल्याचं देखील पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. पंतप्रधान मोदी या दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचीही भेट घेरणार आहेत. यावरूनच आता शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी बायडेन यांना टॅग करून एक ट्विट केले आहे.

टिकैत यांनी ट्विटकरत जो बायडेन यांना हिंदुस्थानातील नवीन कृषी कायदे रद्द करण्यास मदत करावी म्हणून आवाहन केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, प्रिय जो बायडेन, आम्ही हिंदुस्थानी शेतकरी मोदी सरकारद्वारे आणले गेलेले तीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहोत. 11 महिन्याच्या आंदोलन दरम्यान आतापर्यंत 700 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. आमच्या बचावासाठी हे कायदे रद्द केले पाहिजेत. मोदी यांच्या भेटीदरम्यान आमच्या हिताची काळजी घ्या.’ असे आवाहन टिकैत यांनी बायडेन यांना केले आहे.

टिकैत यांच्या ट्विटनंतर #Biden_SpeakUp4Farmers हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची क्वाड देशांच्या नेत्यांशी भेट होणार आहे. क्वाड देशांच्या या बैठकीत हिंदुस्थान, अमेरिका व्यतिरिक्त जपान आणि ऑस्ट्रेलियाही सहभागी होणार आहेत. दरम्यान, केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्याविरोधात गेल्या एक वर्षांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांनी मागीलवर्षी ऑक्टोबरमध्ये या आंदोलनाची सुरुवात केली होती. मात्र अद्यापही केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केलेल्या नाही आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या