शेतकरी कर्जमुक्तीची दुसरी यादी जाहीर, 21 लाख 82 हजार कर्ज खात्यांचा समावेश

1476

महाविकास आघाडी सरकारने घोषणा केलेल्या ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती’ योजनेतील शेतकऱ्यांची दुसरी यादी सहकार विभागाने शनिवारी जाहीर केली. या यादीत 21 लाख 82 हजार कर्जखात्यांचा समावेश करण्यात आला आहे.

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली प्रायोगिक तत्त्वाकरील यादी 24 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आली होती. त्यात 68 गावांतील 15 हजार 358 कर्जखात्यांचा समावेश करण्यात आला होता. दुसऱ्या यादीत 21 लाख 82 हजार खात्यांची गावनिहाय यादी जाहीर करण्यात आली आहे.

राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांतील सर्व शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने 13 जिल्ह्याच्या अंशत: याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत तर ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितामुळे 6 जिल्ह्यांतील याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या नसल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे.

राज्यातील 36 लाख 45 हजार कर्जखात्यांपैकी पोर्टलवर 34 लाख 98 हजार खात्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी गावनिहाय यादी प्रसिद्ध केलेल्या खात्यांची संख्या 21 लाख 82 हजार इतकी आहे. शासनाने या खात्यांच्या कर्जमुक्तीसाठी 14 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. प्रमाणीकरणानंतर संबंधित शेतकऱयांच्या कर्जखात्यावर व्यापारी बँका 24 तासांमध्ये तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका 72 तासांमध्ये रक्कम जमा करणार आहेत.

सोमवारपासून त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा
शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत 1 लाख 25 हजार 449 शेतकऱयांचे प्रमाणीकरण झाले आहे. आज रविवार सुट्टी असल्यामुळे सोमवारपासून त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील, अशी माहिती सहकार प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी दिली.

लाभ मिळण्यात शेतकऱयांना अडचणी येऊ देऊ नका
या यादीतील शेतकऱयांनाही व्यवस्थित लाभ मिळेल याकडे लक्ष देण्यात यावे. कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यात शेतकऱयांना अडचणी येऊ देऊ नका. त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या तत्काळ सोडविण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या