लातूर-जहीराबाद महामार्गाचे काम थांबवणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखले

56

सामना प्रतिनिधी । लातूर

लातूर-जहीराबाद महामार्गामध्ये आमच्या जमिनी गेल्या आहेत. त्याचा आधी मावेजा द्या, त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करा, मगच रस्त्याचे काम सुरू करा, अशी मागणी करत निलंगानजीक औराद शहाजनी येथे महामार्गाचे काम थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या 48 शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात एका महिला शेतकऱ्यांचाही समावेश आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या शिवसेना सहसंपर्कप्रमुख अभय साळुंके यांनी पत्रकार परिषद घेऊन घटनेचा निषेध केला. प्रशासनाची दंडेलशाही खपवून घेणार नाही. यापुढे कोणालाही न घाबरता अधिक तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा अभय साळुंके यांनी दिला आहे.

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांच्या कार्यालयात 14 डिसेंबरला महामार्ग आंदोलक शेतकऱ्यांसोबत बैठक झाली होती. त्यात जहीराबाद-लातूर महामार्ग 24 मीटर रुंदीचा असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला ३ मीटर जमीन संपादित केली जाईल, असे पालकमंत्र्यांनी जाहीर केले होते. पाचशे मीटर अंतरावर पाईपलाईनसाठी अंडरपास, जनावरे जाण्यासाठी अंडरपास, सर्विस रोड इत्यादी सुधारणा करण्यासाठी पुरवणी अंदाजपत्रक करून केंद्रीय रस्ते विकास मंत्र्यांकडे पाठपुरावा करून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यात येतील असेही पालकमंत्री म्हणाले होते. रोज दोन वेळेस रस्त्यावर पाणी मारून धुळीचा होणारा त्रास कमी करण्यासाठी आदेश देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. अजूनही रस्त्यावर कामाचे स्वरूप आणि अंदाजपत्रक इत्यादी माहितीचा फलक लावला गेला नाही. त्याचा निषेध शेतकऱ्यांनी केला आहे. आधी मावेजा द्या, नंतरच काम करा अशी मागणी करत महामार्गाचे काम बंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 48 शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या