मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर शेतकऱ्यांनी दूध, गोमूत्राने रस्ते धुतले

30

सामना प्रतिनिधी । नाशिक

संपूर्ण कर्जमुक्त करा, शेतीमालाला हमीभाव द्या, अशा घोषणा देत आज लासलगाव येथे संतप्त शेतकऱयांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ घातला. तीनच लोक आहेत, मला आता याची सवय झालीय असे सांगत मुख्यमंत्र्यांनी याकडे दुर्लक्ष केले, टाळ्या वाजवा… असे उपस्थितांना सूचवून वेळ मारून नेली. मुख्यमंत्र्यांच्या दौऱयानंतर नैताळे येथे दूध व गोमूत्राने रस्ता धुऊन सरकारचा निषेध करण्यात आला.

लासलगाव येथील रेल्वे स्थानकाजवळ आज दुपारी देशातील पहिल्या अडीच हजार टन क्षमतेच्या शीतगृहाचे भुमिपूजन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होताच शेतकरी उभे राहिले, शेतकऱयांच्या हिताचे बोला, अशी मागणी करू लागले. मुख्यमंत्री काही मिनिटे बोलल्यानंतर शेतकरी आक्रमक झाले, भाषणबाजी नको, संपूर्ण कर्जमुक्त करा, हमीभाव द्या, अशा घोषणा दिल्याने सभेत एकच गोंधळ उडाला. घोषणाबाजीची दखल मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागली. उपस्थितांना बसण्याची विनंती करूनही गोंधळ थांबत नसल्याने, आपल्याला याची सवय आहे, प्रत्येक सभेत असे तीन-चारजण येतात, नारे देतात, निघून जातात, असे म्हणून त्यांनी भाषण पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही घोषणाबाजी सुरूच राहिल्याने त्यांनी टाळ्या वाजवा असे उपस्थितांना आवाहन करीत घोषणा देणाऱया शेतकऱयांचा आवाज दडपविण्याचा प्रयत्न केला. यानंतर शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांसह एका महिला शेतकऱयाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

नैताळेत कडकडीत बंद

नैताळेकरांनी आज कडकडीत बंद पाळून शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा निषेध केला, सरसकट कर्जमुक्ती करा, अशी मागणी केली. मुख्यमंत्री लासलगावला नैताळेमार्गे गेले. गाव बंद ठेवून, तसेच वेशीवर टाळ वाजवत नैताळेकरांनी भाजपा सरकारचा निषेध केला. मुख्यमंत्र्यांच्या गाडय़ांचा ताफा जाताच नाशिक-संभाजीनगर महामार्ग दूध, गोमूत्राने धुऊन त्यांनी अनोखे आंदोलन केले.

समृद्धीविरोधात रक्ताने पत्र लिहिले

समृद्धी महामार्गाला विरोध दर्शविण्यासाठी सिन्नर तालुक्यातील शिवडे येथील शेतकऱयांनी मुख्यमंत्र्यांसाठी रक्ताने निवेदन लिहिले. वेळ आलीच तर रक्त सांडू पण, इंचभरही जमीन देणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या