नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन, नैताळे बंद

62
निफाड तालुक्यातील चांदोरी येथे आंदोलन करताना शेतकरी. (छाया - भूषण पाटील)

सामना प्रतिनिधी, नाशिक

स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, शेतीला मोफत वीज द्यावी, संपूर्ण कर्जमुक्त करावे, यासह विविध मागण्यांसाठी किसान क्रांतीच्या सुकाणू समितीने आज नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन केले.

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आज राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले. त्यानुसार नाशिक-पुणे रस्त्यावर शिंदे-पळसे, त्र्यंबकेश्वर रस्त्यावर महिरावणीत, निफाड तालुक्यात चांदोरी येथे, तसेच मनमाड, नांदगाव, दिंडोरी, सुरगाणा, पेठ, घोटी, चांदवड, नामपूरजवळ द्याने फाटा, नाशिकजवळील गिरणारे येथे आंदोलन करून वाहतूक रोखण्यात आली.

शेतकऱ्यांना तीन हजार रुपये निवृत्तीवेतन द्यावे, पीकविम्याची रक्कम शासनाने भरावी, समृद्धी महामार्गासाठी बागायती जमिनी घेवू नये यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. महिरावणी व गिरणारेत बैलगाड्या, शेती अवजारांसह शेतकरी रस्त्यावर उतरले होते. ठिकठिकाणी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेवून नंतर त्यांची सुटका केली.

या आंदोलनात समन्वयक राजू देसले, डॉ. डी. एल. कराड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले, नाना बच्छाव, देवीदास भोपळे, समाधान भारतीय, दत्तात्रय गडाख, राम निकम, करण गायकर, गणेश कदम, राम खुर्दळ, अनिल थेटे, लहानू पाटील, दिनकर थेटे, निवृत्ती घुले आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

चक्काजाम
कळवण – येथील प्रशासकीय इमारतीसमोर कोल्हापूर फाटा, मानूर येथे मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला सीपीएमचे नेते सावळीराम पवार, हेमंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. या वेळी कळवणचे तहसीलदार कैलास चावडे यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

महामार्ग रोखला
मनमाड – येथील मालेगाव चौफुलीवर तीक्र निदर्शने करत शेतकऱ्यांनी बाजार समितीपासून मोर्चा काढला. या वेळी मालेगाव मनमाड राज्य महामार्ग सुमारे पाऊणतास रोखून धरण्यात आला. यामुळे राज्य महामार्गावरील वाहतूक सुमारे पाऊणतास ठप्प झाली होती. कळवण येथील प्रशासकीय इमारतीसमोर कोल्हापूर फाटा, मानूर येथे मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

रस्त्यावर ठाण

साक्री – दहिवेल येथे नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावर सत्यशोधक शेतकरी सभेच्या कॉ. किशोर ढमाले व कॉ. सुभाष काकुस्ते यांच्या नेतृत्वाखाली दहिवेल-चौफुली येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलनास सुरुवात झाली. यावेळी रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांमुळे वाहतूक पूर्णतः थांबल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या.

आंदोलन केल्यास तडीपार करू, असे पोलिसांनी धमकावल्याच्या निषेधार्थ निफाड तालुक्यातील नैताळे गावात आज कडकडीत बंद पाळण्यात आला, या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

 

आपली प्रतिक्रिया द्या