पुन्हा एक अंदाजपंचे!

35

एकीकडे आपण आधुनिक उपग्रह अवकाशात सोडत आहोत, नवे विक्रम प्रस्थापित करीत आहोत, पण हवामान खात्याच्याअचूक अंदाजाचा विक्रम प्रस्थापित करणे मात्र आपल्या यंत्रणांना अद्याप जमलेले नाही. निदान आता तरी हवामान खात्याचे पुन्हा एक अंदाजपंचे खरा ठरो, त्यानुसार राज्यात पुढील ४८ तासांत सर्वत्र पर्जन्यवृष्टी होवो आणि त्या पाण्यात दुबार पेरणीचे संकट वाहून जावो हीच अपेक्षा!

राज्यात येत्या ४८ तासांत पुन्हा मुसळधार पाऊस पडेल असा नवा अंदाज हवामान खात्याने आता वर्तवला आहे. काही भागांत तुरळक सरी सोडल्या तर राज्यात वरुणराजाने मागील तीन आठवड्यांपासून दडीच मारली आहे. किंबहुना १२ जिल्ह्यांत पेरण्यांची अवस्था चिंताजनक झाली आहे. दहा जिल्ह्यांत सरासरीएवढा किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला आहे, तर अनेक जिल्ह्यांत सरासरीच्या जेमतेम २५ ते ४० टक्के एवढा कमी पाऊस झाला आहे. साहजिकच या ठिकाणी दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. राज्यात झालेली ८० टक्के पेरणी लक्षात घेतली तर दुबार पेरणीचे संकट किती मोठे आणि गंभीर आहे याची कल्पना येते. ज्या २० टक्के पेरण्या बाकी आहेत त्या आणखी किती लांबवायच्या या प्रश्नामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारने आता सांगितले आहे की, पेरण्या लांबवा. पावसाने दिलेली ओढ पाहता त्यांच्या या सूचनेत अस्वाभाविक काहीच नाही, पण हवामान खात्याच्या अंदाजांचे काय? हिंदुस्थानसारख्या देशात मान्सूनही लहरी आणि हवामान खात्याचे पावसाचे अंदाजही रामभरोसे असतात. ना मान्सूनचा अंदाज ना हवामान खात्याच्या भाकितांचा. वर्षानुवर्षे या कोंडीत शेतकऱ्यांचा खरिपाचा हंगाम जातो. पेरण्या लांबवणे हा अशा परिस्थितीत एक पर्याय असला तरी हवामान खात्याचे अंदाज सुधारणे हा त्यापेक्षा प्रभावी पर्याय ठरू शकेल. मान्सूनचा लहरीपणा आपल्या हातात नाही. निदान हवामान खात्याचे अंदाज ‘किमान अचूक’ देण्याचे काम अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने होऊ शकते. आजपर्यंत ते का होऊ शकलेले नाही हा तसा प्रश्नच आहे. एकीकडे नवनवीन आधुनिक उपग्रह आपण अवकाशात सोडत आहोत, नवे विक्रम प्रस्थापित करीत आहोत, पण हवामान खात्याच्या ‘अचूक अंदाजा’चा विक्रम प्रस्थापित करणे मात्र आपल्या यंत्रणांना अद्याप जमलेले नाही. हा ‘विक्रम’ जेव्हा हवामान खाते करून दाखवील तेव्हा ना ‘पेरण्या लांबवा’चे आवाहन करण्याची वेळ राज्यकर्त्यांवर येईल ना कर्जाच्या बरोबरीने दुबार-तिबार पेरणीचेही ओझे बळीराजाला वाहावे लागेल. निदान आता तरी हवामान खात्याचे पुन्हा एक अंदाजपंचे खरा ठरो, त्यानुसार राज्यात पुढील ४८ तासांत सर्वत्र पर्जन्यवृष्टी होवो आणि त्या पाण्यात दुबार पेरणीचे संकट वाहून जावो हीच अपेक्षा!

मिशा आणि भ्रष्टाचार

मिशा आणि भ्रष्टाचार यांचा काय संबंध? मात्र लालूपुत्र आणि बिहारचे तरुण उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रसाद यांनी तो जोडला आहे. तेजस्वी प्रसाद यांच्यासह संपूर्ण लालू यादव परिवारच सध्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयच्या कचाटय़ात सापडला आहे. लालूपुत्र तेजस्वी आणि मुलगी मिसा भारती यांच्याही विरोधात सीबीआयने गुन्हे दाखल केले आहेत. ‘हे सर्व आरोप २००४ मधील आहेत. त्यावेळी मला मिशाही नव्हत्या. त्यामुळे मी भ्रष्टाचार कसा करेन’, असा ‘तेजस्वी’ सवाल या लालूपुत्राने केंद्र सरकारला केला आहे. थोडक्यात, आपण त्यावेळी १२-१३ वर्षांचे होतो. आपल्याला मिसरूडही फुटलेले नव्हते. साहजिकच त्या वयात भ्रष्टाचाराची ‘अक्कल’ कशी असणार, असे तेजस्वी यादव यांना म्हणावयाचे असावे. त्यांचा हा सवाल वरकरणी बिनतोड आहे, पण मिशा असलेले भ्रष्टाचारी आणि मिशा नसलेले ‘स्वच्छ’ हे त्यांचे समीकरण त्यांच्याच वडिलांनाही लागू होणारे नाही. अगदी चारा घोटाळा उघड झाला तेव्हाही लालूप्रसाद हे ‘मिशाधारी’ नव्हतेच. तेव्हादेखील ते ‘क्लीन शेव्हड्’ होते. आताही ते तसेच आहेत. तरीही भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून त्यांच्याविरुद्ध पुन्हा सीबीआयचा ससेमिरा लागलाच आहे ना! त्यातील राजकारणाचा भाग सोडला तरी लालू यादव यांची सर्वसाधारण प्रतिमा ‘भ्रष्ट’ अशीच आहे. याउलट ज्या मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सरकारमध्ये तेजस्वी उपमुख्यमंत्री आहेत त्या नितीशबाबूंचे ‘कोरीव दाढी’ हे वैशिष्टय़ आहे. मात्र त्यांची प्रतिमा ‘स्वच्छ राजकारणी’ अशी आहे. त्यांच्यावर पूर्वीपासूनच कुठलाही भ्रष्टाचाराचा डाग नाही. म्हणजे तेजस्वी यादव यांच्या ‘मिशा आणि भ्रष्टाचार’ या समीकरणात ना लालू बसतात ना नितीशकुमार. खुद्द तेजस्वी यांनीही आता कोरीव दाढी आणि मिशी ठेवलेली दिसते. मग २००४ मध्ये मिशा नव्हत्या म्हणून स्वतःला ‘स्वच्छ’ म्हणणाऱ्या तेजस्वी यांच्याबद्दल बिहारमधील सामान्य जनतेने आता काय समजायचे?

आपली प्रतिक्रिया द्या