उत्तर प्रदेशात भाजप कार्यकर्ते, शेतकऱ्यांमध्ये राडा

कृषी कायद्यांच्या निषेधार्थ केंद्रीय राज्यमंत्री डॉ. संजीव बालियान यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी गेलेल्या तरुणांना मारझोड करण्यात आली. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होऊन शेतकरी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. या हिंसाचारात अनेक जण जखमी झाले. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर जिह्यातील सोराम गावात सोमवारी ही घटना घडली.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. बालियान हे शोकसभेसाठी सोराम गावात आले होते. त्यांच्या उत्तर प्रदेश दौऱ्याला विरोध करण्यासाठी काही तरुण तेथे गेले होते. त्यावेळी डॉ. बालियान यांच्यासोबत असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्यासाठी आलेल्या तरुणांना मारहाण केली. या मारहाणीचे पडसाद उमटून शेतकरी व भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. यात तिघा तरुणांना गंभीर दुखापत झाली. भाजप कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीचा राष्ट्रीय लोक दल पार्टीने तीव्र निषेध केला आहे.

लाल किल्ल्याच्या घुमटावर चढणाऱ्या तरुणाला अटक

26 जानेवारीला शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रक्टर रॅलीदरम्यान लाल किल्ल्याच्या घुमटावर चढणारा तरुण जसप्रित सिंग ऊर्फ सन्नी याला अखेर सोमवारी दिल्ली पोलिसांनी अटक केली. तो लाल किल्ल्यावरील स्टीलची सळी हातात घेऊन आंदोलक शेतकऱ्यांना भडकावत होता, असा आरोप आहे. लाल किल्ल्याच्या आवारात हिंसाचार घडवणाऱ्या आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी छायाचित्रे जारी केली होती. त्याआधारे जसप्रितच्या हातात बेडय़ा ठोकण्यात आल्या.

आपली प्रतिक्रिया द्या