राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कोणतीच मदत मिळाली नाही!

अतिवृष्टी व वर्धा नदीच्या प्रकल्पातून सोडलेल्या पाण्यामुळे जमीन खरडून गेल्याने बाधित शेतकऱयांना सरकारकडून कोणतीच मदत मिळाली नसल्याचे सांगत आज शेतकऱयांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या अतिवृष्टी पाहणी दौऱयात आपल्या व्यथा मांडल्या.

अतिवृष्टीमुळे व अप्पर वर्धा, लोअर वर्धा व बेंबळा या प्रकल्पातील अतिरिक्त पाणी सोडल्याने जमीन खरडून गेल्याने यवतमाळ जिह्यातील अनेक गावांतील कापूस, सोयाबीन व तूर उत्पादक शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. आज विरोधी पक्षनेते दानवे यांनी दापोरी (कसारा), मारेगाव तालुका दांडगाव, वनोजा (देवी) या ठिकाणी शेतकऱयांच्या बांधावर जाऊन पाहणी करीत शेतकऱयांशी संवाद साधला.

अतिवृष्टी व अतिरिक्त पाणी सोडल्याने जमीन खरडून गेली त्यामुळे तीबार पेरणी करावी लागली, त्यामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. त्यात सरकारकडून मदत न मिळाल्याने शेतकऱयांना आत्महत्या करण्याची वेळ आल्याच्या व्यथा आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या कुटुंबियांनी दानवे यांच्याकडे मांडल्या.

शिवसेनेने दिला शेतकरी कुटुंबीयांना मदतीचा हात

सरकारकडून अतिरिक्त पाणी सोडल्यामुळे तिबार पेरणी करून शेतीचे नुकसान झालेल्या बोरी गावातील पुंडलिक रोयारकर यांच्या कुटुंबियाला यवतमाळ जिह्यातील शिवसैनिकांनी 25 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. यावेळी त्यांच्या कुटुंबियांचा अश्रूचा बांध फुटला. त्यांच्या मुलीने भावुक होऊन दानवेंचे आभार मानले. भावुक झालेल्या मुलीला धीर देत दानवे यांनी शिवसेना त्यांच्या सोबत असल्याचा शब्द दिला.