अनोखे पशु प्रेम, रेड्याच्या तेराव्याला डझनभर गावांना जेवण

23

सामना ऑनलाईन।भोपाळ

पशुप्रेमींबदद्ल त्यांच्या प्राण्यावरील प्रेमाबद्दल आपण नेहमीच ऐकत असतो. पण मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यात एका शेतकऱ्याने पशुप्रेमाचे आगळे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. या कुटुंबाकडे राजाजी नावाचा एक रेडा होता. त्याचे वीर्य विकून हे कुटुंब इतके श्रीमंत झाले की ते आता झोपडी सोडून चारमजली बंगल्यात राहत आहेत. हे वैभव रेड्यामुळेच प्राप्त झाले अशी त्यांची भावना आहे. याच भावनेतून रेड्याच्या तेराव्याला या शेतकऱ्याने आजूबाजूच्या डझनभर गावांना गावजेवण घातलं. यामुळे मध्य प्रदेशमध्ये या रेड्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

मुसरु यादव असे या शेतकऱ्याचे नाव आहे. २५ वर्षांपूर्वी त्याने २५ आठवड्यांचा एक रेडा विकत घेतला होता. उंच धिप्पाड असलेला हा रेडा दिसायला देखणा होता. यादव कुटुंबही त्याची मुलासारखी काळजी घेत होते. बघता बघता या रेड्याची चर्चा आजूबाजूच्या गावापर्यंत पोहचली. मग काय अनेकजण या रेड्याच रेडकू आपल्याकडे असावं या विचाराने म्हशींना प्रजननासाठी या रेड्याकडे आणू लागले. यादव त्याची बक्कळ किंमत घेऊ लागला. त्या पैशातून यादवने झोपडीच्या जागी चारमजली दोन बंगले उभे केले. शेती खरेदी केली.

पण काही दिवसांपूर्वी रेड्याचा मृत्यू झाला. यामुळे यादव कुटुंबीयांसह सगळं गावचं शोकात बुडालं. रेड्यावर यादव कुटुंबाच मुलासारखं प्रेम होत. यामुळे त्यांनी त्याच्यावर हिंदू रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले व तेराव्या दिवशी डझनभर गावांना गावजेवण घातलं. लोकही मोठ्या संख्येने या तेराव्यासाठी आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या