पुरंदरवरचा ‘दुष्काळी’ शिक्का काढणार

47

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे प्रतिपादन

जेजुरी – शिवसेनेचे धोरण शेतकर्‍यांच्या हिताचे असून, औद्योगिक वसाहतीसाठी बागायती जमीन संपादित केली जाणार नाही. ओसाड माळराने घेऊन त्यावर कारखाने उभारले जातील. शिवसेना शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. पुरंदर तालुक्यातील मावडी, कोळविहिरे व नावळी येथील वाड्या-वस्त्या व बागायती जमिनीवरील शिक्के काढण्याचे काम लवकरच सुरू केले जाईल, असे प्रतिपादन शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.

पुरंदर तालुक्यातील कोळविहिरे येथे शेतकर्‍यांच्या सुसंवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, जिल्हा संपर्कप्रमुख सत्यवान उभे, जिल्हाप्रमुख दत्तात्रय टेमघरे, बाळासाहेब भांडे, ज्ञानदेव शेडगे, विनय शिवतारे, दिलीप यादव, संदीप मोडक, अतुल म्हस्के, दादा घाटे, नगरसेवक डॉ. राजेश दळवी, सचिन भोंगळे, छाया सुभागडे, हनुमंत चाचर, विठ्ठल खैरे यावेळी उपस्थित होते.

औद्योगिक महामंडळाने जेजुरी औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी मावडी, कोळविहिरे, नावळी येथील जमिनींचे संपादन करण्यासाठी शेतकर्‍यांच्या सात-बार उतार्‍यांवर शिक्के मारले आहेत. आज या शेतकर्‍यांना भेटून सुभाष देसाई व विजय शिवतारे यांनी संवाद साधला.

देसाई म्हणाले, शिवसेना केवळ विरोधासाठी विरोध करीत नाही. पुरंदरसारखा तालुका ४० वर्षे विकासापासून वंचित आहे. या परिसरातील बेरोजगारी हटवून शेतकर्‍यांचे जीवन सुखी होण्यासाठी ओसाड माळरानावर मोठमोठे कारखाने उभारले जातील. शेतकर्‍यांशी योग्य वाटाघाटी करून जमिनी घेतल्या जातील. त्यांना योग्य भाव, नोकरी व परतावा दिला जाईल.

विजय शिवतारे म्हणाले, शेतकर्‍यांमधील गैरसमज दूर करण्यासाठी आज मेळावा घेतला आहे. उद्योगपतींना मदत करण्यासाठी नव्हे, तर पुढच्या पिढ्यांची व्यवस्था लावण्यासाठी कारखाने उभारण्याचा निर्णय घेतला जात आहे. सुभाष देसाई, विजय शिवतारे यांनी प्रत्यक्ष नावळी परिसरात ओसाड माळरानावर जाऊन जागांची पाहणी केली. यावेळी औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी त्यांच्यासमवेत होते.

आपली प्रतिक्रिया द्या