कपाशीकडून शेतकरी वळले मिरचीकडे, गेल्या हंगामातील कपाशी अजूनही घरातच

336

गेल्या हंगामातील कपाशी अजूनही घरात पडून असल्याने यंदा शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड कमी केली. कपाशीचे घटलेले क्षेत्र आता मिरची पिकाखाली आले आहे. मिरची सरासरी पंधरा ते पंचवीस रुपये किलोच्या दरम्यान विकली जाते. यातून शेतकऱ्यांना बऱ्यापैकी पैसा मिळतो. त्यामुळे आता स्वत:चा अनुभव आणि कसब पणाला लावत धुळे तालुक्यातील वडणे येथील शेतकऱ्यांनी कोळपणीबरोबरच रासायनिक खते देता येईल, अशा पद्धतीची रचना केलेले पांभर निर्माण केले. परिणामी शेतीतील कामाला यंत्राची जोड मिळाली आहे, असे शेतकरी मोठ्या अभिमानाने सांगतात.

धुळे तालुक्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांचे गाव ही वडणेची ओळख आहे. शेतीत निरनिराळे प्रयोग करत उत्पन्न वाढवणे हा वडणे येथील शेतकऱ्यांचा छंद आहे. या परिसरातून कपाशीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होते, परंतु गेल्या वर्षी उत्पादित झालेला कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशी पिकाखालील क्षेत्र आता मिरचीसाठी वापरले आहे. निरनिराळी गुणवैशिष्ट्ये असलेली मिरचीची रोपे शेतीत लावण्यात आली आहेत. बऱ्यापैकी वाढ झाल्यानंतर आता मिरचीच्या रोपांना रासायनिक खत देण्यात येत आहे.

पांभराच्या रचनेत काहीसा बदल करीत येथील शेतकऱ्यांनी गवत काढतानाच मिरचीला रासायनिक खत देता येईल, असा प्रयोग केला आहे. मिरचीचे उत्पन्न सुरू झाले की, किलोला पंधरा ते पंचवीस रुपयांदरम्यान पैसे मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांची र्आिथक चणचण दूर होत आहे. कपाशीचा वाईट अनुभव लक्षात घेता अनेक शेतकरी आता मिरचीचे उत्पन्न घेत आहेत, अशी माहिती माजी सरपंच भटू गिरासे यांनी सांगितले. गिरासे यांच्यासह वसंत कासार, प्रकाश पाटील, दीपक पाटील, सुनील पाटील, जिजाबराव पाटील, सत्तारिंसग गिरासे, राजेंद्र पाटील, प्रमोद पाटील, देविदास ठाकरे, विठ्ठल ठाकरे अशा अनेक शेतकऱ्यांनी कपाशीऐवजी मिरचीची लागवड केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या