नाराज शेतकरी कर्जमाफी प्रमाणपत्र परत करणार

सामना प्रतिनिधी । सोलापूर

कर्जमाफीची घोषणा होऊनही शेतकऱयांचा सात-बारा अद्यापि कोरा झालेला नाही. त्यातच दिवाळीआधी शेतकऱयांच्या कर्जखात्यात रक्कम जमा करण्याच्या घिसाडघाईत सरकारकडून प्रत्येक जिह्यातील पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधकांच्या उपस्थितीत कर्जमाफी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. मात्र, कर्जमाफीच्या घोषणेप्रमाणेच प्रमाणपत्र मिळूनही २६ दिवस उलटून गेले आहेत, तरीही प्रमाणपत्र मिळालेल्या शेतकऱयांची नावे अंतिम पात्र लाभार्थ्यांच्या यादीत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या नाराज शेतकऱयांनी कर्जमाफीची मिळालेली प्रमाणपत्रे शासनाला परत करण्याचा निर्णय घेतला आहे.

जून महिन्यात कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर दीड ते दोन महिन्यांत शेतकऱयांना प्रत्यक्ष लाभ मिळणार असल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर शासनाची सर्व माहिती ऑनलाइनद्वारे अपलोड केली. त्यांनी भरलेल्या माहितीचे गावोगावी चावडीवाचन करण्यात आले. दिवाळीपूर्वी कर्जमाफी देऊन शेतकऱयांची दिवाळी गोड करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. त्यानुसार ठरावीक शेतकऱयांना कर्जमाफी झाल्याची प्रमाणपत्रे घेऊन कर्जदार शेतकऱयांनी संबंधित बँकांमध्ये बेबाकीच्या दाखल्याची मागणी केली असता, त्यांना बँकांकडून नकार देण्यात आला. त्यामुळे या प्रमाणपत्राचा काय उपयोग, एवढा दिखावा कशासाठी, सरकारला शेतकरी बोगस असल्याचा संशय आहे काय, जिल्हा बँकेने जिल्हा उपनिबंधकांमार्फत शासनाला प्रस्ताव पाठवूनही आम्हाला रक्कम मिळण्यासाठी एवढा उशीर का लागतोय? यांसह विविध प्रश्न आता प्रमाणपत्र मिळालेल्या कर्जदार शेतकऱयांकडून केले जात आहेत. ही किचकट कर्जमाफी नकोशी झाल्याच्या भावनाही त्यांच्याकडून व्यक्त होत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या