ताकतोड्यात शेतकरी पीकविम्यासाठी शाळा बंद, ग्रामस्थांनी दिले प्रशासनाला निवेदन

69

सामना प्रतिनिधी । हिंगोली

पीक विम्याची रक्कम एकाही शेतकर्‍याला न मिल्याने सेनगाव तालुक्याच्या ताकतोडा गावातील सर्वच विद्यार्थ्यांनी शाळेवर बहिष्कार टाकला. पालकांच्या मागणीला समर्थन दिल्याने आज शुक्रवारी जिल्हा परिषद शाळा बंद होती. दरम्यान, मुख्यमंत्री महोदय, शेतीसह ताकतोडा गावच विकत घ्या अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनामार्फत निवेदन देऊन केली आहे.

 सेनगाव तालुक्यातील ताकतोडा गावाची लोकसंख्या 4 हजार असुन 1 हजार 700 च्यावर मतदार आहेत. ताकतोड्यातील जवळपास 700 शेतकर्‍यांना मागील दोन वर्षापासुन पीक विमा मिळाला नाही. या गावासह 25 गावांचा समावेश आजेगाव मंडळात आहे.

आजेगाव मंडळातील फक्त 35 शेतकरी मागिल वर्षी पिकविम्यासाठी पात्र ठरले तर यावर्षी एकाही शेतकर्‍याला एकही छदाम मिळाला नाही. दुष्काळी व डोंगरी भाग असलेल्या सेनगाव तालुका व ताकतोडा गावातील शेतकरी मागील तीन वर्षांपासून दुष्काळग्रस्त आहेत. यामुळे शेतकर्‍यांनी गावच विकत घ्यावे अशी मागणी करून खळबळ उडवून दिली आहे. शासकीय योजनेचा लाभ मिळत नसल्याने शेतकर्‍यांनी हे पाऊल उचलले.  आजेगाव मंडळातील सर्वच गावांतील शेतकर्‍यांना तात्काळ पीकविमा देण्यात यावा, शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अन्यथा ताकतोडा गाव विक्रीस काढावे, गावाची विक्री झाल्यानंतर ग्रामस्थांना रोजगार देण्याची व्यवस्था हिंगोलीच्या औद्यागिक वसाहतीमध्ये  करावी,  राज्य शासन शेतकर्‍यांच्या हिताचे कोणतेही काम न केल्यामुळे हिंगोली जिल्हा  केंद्रशासीत घोषीत करावा. अशी मागणी दुष्काळाने त्रस्त झालेल्या ताकतोडा गावातील ग्रामस्थांनी सेनगावच्या तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या