इगतपुरीजवळ शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन

34
प्रातिनिधिक छायाचित्र

सामना ऑनलाईन । नाशिक

कसलीही पूर्वसूचना न देता बाजार समितीने केलेल्या आकस्मिक स्थलांतराविरोधात शेतकरी आक्रमक झाल्याची घटना नाशिकजवळ इगतपुरी इथे घडली आहे. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाजारात विक्रीसाठी आणलेला माल महामार्गावर फेकून चक्काजाम आंदोलन सुरू केलं आहे. गेल्या चार तासांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे नाशिक महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शेतमालांना भाव नाही. त्यात भर म्हणून अनेक वर्षांपासून बाजार समितीत नियमित सुरू असलेल्या बाजाराचं अचानक स्थलांतर करण्यात आलं. त्याची कोणतीही पूर्वसूचना शेतकऱ्यांना देण्यात आली नाही. ही नवीन जागा शेतकऱ्यांसाठी गैरसोयीची असून शेतकऱ्यांना इथे कोणत्याच सुविधा उपलब्ध नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचा संताप आज अनावर झाला आणि त्यांनी चक्का जाम आंदोलन पुकारलं.

टोमॅटो, दुधी भोपळे, फ्लॉवर यांसारख्या फळभाज्या रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केल्यामुळे घोटी टोलनाक्याजवळ दोन्ही बाजूंच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या