पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी घेतली पवारांची भेट, मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार

36

सामना ऑनलाईन । नगर

राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर समाधान न झालेल्या पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी सोमवारी राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत आपले गाऱ्हाणे मांडले. कर्जमाफीचा निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांनी, दीड लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी ‘वन टाइम सेटलमेंट’ योजनेची घोषणा केली. या योजनेत थकबाकीच्या २५ टक्के किंवा दीड लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल त्या रकमेचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल. तसेच नियमित कर्जाचे हप्ते भरणाऱ्या शेतकऱ्यांना २५ हजारांपर्यंतचे अनुदान दिले जाईल असे म्हटले होते. मात्र नियमित कर्ज भरणाऱ्यांना ५० टक्के किंवा ५० हजारांचे अनुदान द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत शरद पवार यांनी आपण याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे. दरम्यान मंगळवारी पुणतांब्याचे शेतकरी आपल्या मागण्या घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

कर्जमाफी करताना सरकारने शेतकऱ्यांना न्याय दिला नाही. नियमित कर्ज भरणाऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळवून देण्यासाठी आणखी सोईसुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच दुष्काळी परिस्थिती असताना वीज बिलामध्ये सवलत द्यावी. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेल्या खोटे गुन्हे मागे घ्यावेत या मागण्यांकडे शेतकऱ्यांनी लक्ष वेधले.

आपली प्रतिक्रिया द्या