एकजूट कायम ठेवा, नाहीतर तोंडाशी आलेला घास जाईल!

सामना प्रतिनिधी । मुंबई

शेतकऱयांच्या एकजुटीमुळेच सरकारला झुकावे लागले आणि कर्जमुक्तीची घोषणा करावी लागली; पण नुसता पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करू नका. गाफील राहू नका, एकजूट कायम ठेवा. नाहीतर हातातोंडाशी आलेला घास निघून जाईल, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या तमाम शेतकऱयांना आज केले.

पुणतांब्यातील शेतकऱयांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि शेतकरी संपात शिवसेना खंबीरपणे पाठीशी उभी राहिल्याबद्दल आभार मानले. कुणीही खासदार किंवा आमदाराने किंवा मंत्र्यांनी आम्हाला समजून घेतले नाही, पण तुम्ही आम्हाला समजून घेतले अशा भावना शेतकऱयांनी व्यक्त करताच, ते माझे कर्तव्यच आहे. शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे. एखाद्याला वचन देण्यापूर्वी एकदा नाही, लाख वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिला तर तो प्राण असेपर्यंत पाळायचा. त्याप्रमाणेच मी शेतकऱयाला कर्जमुक्तीचा दिलेला शब्द पाळत असल्याचे उध्दव ठाकरे यांनी सांगितले.या भेटीनंतर उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, परिवहन मंत्री दिवाकर रावते, खासदार विनायक राऊत, चंद्रकांत खैरे आदी उपस्थित होते.

शेतकऱयांनी क्रांतीची खरी ठिणगी टाकली

आपला देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो परंतु सगळय़ात दुर्लक्षिला जातो तो शेतकरी. त्या शेतकऱयांनीच क्रांतीची खरी ठिणगी टाकली. आतापर्यंत हरीतक्रांतीचे गोडवे गायले गेले, पण त्या हरीतक्रांती करणाऱयांनी एक वेगळी क्रांती केली, क्रांतीची ठिणगी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱयांनी टाकली याचा मला अभिमान आहे असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

कमिटय़ा लक्षात ठेवण्यासाठी कमिटी नेमा

सरकारने आतापर्यंत नुसत्याच कमिटय़ा नेमल्या. गेल्या दोन ते अडीच वर्षात शेतकऱयांच्या कर्जमुक्तीबद्दल किती कमिटय़ा नेमल्या ते लक्षात ठेवण्यासाठी एक कमिटी नेमा असा टोला उध्दव ठाकरे यांनी लगावला.

निकष अधिकृतपणे  आले नाहीत

सरकारने जे निकष जाहीर केलेत ते अतिशय अडचणीचे आहेत. याबद्दल पत्रकारांनी विचारताच असे निकष आमच्याकडे चर्चेसाठी अजून आलेले नाहीत. हे निकष कसे असतील ते बघु. पण,सर्वात आधी सातबारा कोरा करा ही आमची प्रमुख मागणी आहे. त्यानंतर निकषांचं बघु. ते खरेच आहेत की अशाच कुणीतरी वावडय़ा उठवल्या आहेत ते बघावं लागेल.

म्हणूनच 24 तासांत  कर्जमुक्तीची घोषणा

जुलैमध्ये राजकीय भुकंप करू अशी घोषणा शिवसेनेच्या नेत्यांनी केली याबद्दल पत्रकारांनी विचारताच म्हणूनच तर 24 तासांत कर्जमुक्तीची घोषणा झाली ना, असे उध्दव ठाकरे ताडकन म्हणाले.

सरकारच्या हमीला भाव नाही

सरकार आपल्या शब्दाला जागेल अशी आशा आहे. महाराष्ट्रातली परिस्थिती अशी आहे की, शेतकऱयांना हमीभाव नाही आणि सरकारच्या हमीला भाव नाही. पण, सरकार आपल्या हमीला जागेल आणि शिवसेना ते करून घेईल. आमच्यावर सातत्याने टीका केली जाते. सत्तेत राहून तुम्ही टीका करता. पण मी टीकेसाठी टीका नाही करत. मी जनतेच्या न्याय हक्कासाठी उभा राहातो. त्यांच्यासाठी लढतो आणि याहीपुढे अशी लढण्याची वेळ आलीच तर सत्तेची पर्वा न करता शेतकऱयांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहाणार नाही असे उध्दव ठाकरे म्हणाले.

 मला सरकारी भाषा कळत नाही

तत्वत: या शब्दाला शिवसेनेचा आक्षेप आहे का याबद्दल पत्रकारांनी विचारले असता, मला सरकारी भाषा कळत नाही. मला सर्वसामान्यांची भाषा कळते. शब्दांच्या खेळात अडकायचे नाही. हे काही शेतकऱयांचे साहित्य संमेलन नाही. मला फक्त सातबारा कोरा हवा. शेतकरी कर्जमुक्त व्हायला पाहिजे. मराठी भाषेत अनेक शब्दभांडार आहे. कुठलाही शब्द वापरा. मला तमाम शेतकऱयांचा सातबारा कोरा पाहिजे म्हणजे पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.