शेतकऱ्यांनी मोर्चा वळवला भाजप खासदार–आमदारांच्या घरांकडे

16

सामना प्रतिनिधी । नगर

कर्जमाफीसाठी राज्यातील शेतकऱयांनी पुकारलेल्या संपाची, आंदोलनाची धग वाढतच चालली आहे. नगर जिह्यात आज भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्या घरावर शेतकऱयांनी धडक मारली. त्यामुळे शेतकऱयांनी आपला मोर्चा आता भाजपच्या खासदार-आमदारांच्या घरांकडे वळवल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सरकारने भाजपचे मंत्री आणि नेत्यांच्या घरांवर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

संतप्त शेतकऱयांनी आज नगरचे खासदार दिलीप गांधी यांच्या घरावर मोर्चा नेत जोरदार निदर्शने केली. यावेळी शेतकऱयांनी रस्त्यावरच भाकरी, चटणी खाऊन सरकारचा निषेध केला. ‘मंत्री तुपाशी, शेतकरी उपाशी’ अशी घोषणाबाजी करीत शेतकऱयांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या शेतकऱयांना अटक केली. संपात सहभागी झाल्याबद्दल शिवसेनेचे तालुकाप्रमुख संदेश कार्ले यांना आज पोलिसांनी घरातून अटक केली. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

नगर शहरातही आज ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. अनेक ठिकाणी दूध व भाज्या रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. उद्या नाशिक येथे होणाऱया कोअर कमिटीच्या बैठकीला नगर जिह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीत ठरेल त्याप्रमाणेच पुढील आंदोलनाची दिशा ठरली जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कर्जत दौऱ्याकडे उद्या लक्ष

नगर जिह्याच्या दौऱ्यावर शुक्रवारी (दि. ९) मुख्यमंत्री कर्जत तालुक्याच्या दौऱयावर येत आहेत. त्यादृष्टीने आज प्रशासनाने आढावा बैठक घेतली. संपाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचा आदेश देण्यात आला आहे, मात्र दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांचा दुसरीकडचा दौरा रद्द झाल्यामुळे नगर जिह्यातील दौऱयाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या