शेतकऱ्यांचे कैवारी शेतकऱ्यांना न भेटताच गेले! मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर संताप

मुख्यमंत्री आले, भ्रष्टाचाराने बरबटलेल्या गोदावरी बँकेला भेट देऊन औंढय़ाकडे रवाना झाले. शेतकऱयांचे पैवारी असल्याचा दावा करणारे शेतकऱयांकडे पाठ फिरवून गेले. पाचव्यांदा सुधारित करण्यात आलेल्या दौऱ्यात मुख्यमंत्री अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार मोठय़ा प्रमाणावर शेतकरी गोळा झाले होते, परंतु त्यांच्याकडे ढुंकूनही न पाहता गद्दारांच्या कार्यक्रमांना हजेरी लावून मुख्यमंत्र्यांनी औंढय़ाकडे प्रस्थान केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवार व मंगळवार असे दोन दिवस नांदेड व हिंगोली जिह्यांच्या दौऱयावर येणार होते. या दोन्ही जिह्यांतील पिके अतिवृष्टीमुळे बरबाद झाली आहेत. पंचनामे झाले असले तरी मदतीच्या नावाने शंख आहे. मुख्यमंत्री येत आहेत, त्यामुळे शेतकऱयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु, दौऱयात केवळ पाच मिनिटे अतिवृष्टीच्या पाहणीसाठी देण्यात आली. त्यावरून टीकेचा आसूड उठताच मुख्यमंत्र्यांच्या दौऱयात तब्बल पाचवेळा बदल करण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाचव्यांदा आलेल्या सुधारित दौऱयात नांदुसा येथे शेतकऱयांशी संवाद आणि पिकांच्या नुकसानीची पाहणी ते करणार होते. मुख्यमंत्री येणार असल्याने या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर शेतकरी गोळा झाले होते, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्याकडे पाठ फिरवून औंढय़ाकडे रवाना झाले. औंढय़ाकडे रवाना होण्यापूर्वी गद्दार खासदार हेमंत पाटील यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या गोदावरी अर्बन बँकेला त्यांनी भेट दिली. त्यानंतर भक्ती लॉन्स येथे मेळाव्यात भाषण केले. शहरातील विविध विकासकामांचा बटन दाबून मुख्यमंत्र्यांनी शुभारंभ केला.

राजकीय कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वेळ आहे. पण अतिवृष्टीने नागवल्या गेलेल्या शेतकऱयांना भेटण्यासाठी, त्यांचे अश्रू पुसण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. मदत देऊ नका, पण निदान आमची विचारपूस त्यांनी केली असती, तरीही बरे वाटले असते, अशी संतप्त प्रतिक्रिया उपस्थित अनेक शेतकऱयांनी बोलून दाखवली.