द्राक्षांना शेकोटी, शेतकऱ्यांची नाईट ड्युटी

राज्यात पारा अचानक घसरल्याने थंडीची लाट आली आहे. अवघ्या राज्याला या थंडीमुळे हुडहुडी भरली असली तरी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना घाम फुटला आहे. कारण, घसरत्या तापमानात त्यांना हातातोंडाशी आलेलं पीक वाचवण्यासाठी नाईट ड्युटी करावी लागत आहे.

सोमवारपासून घसरलेल्या पाऱ्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी पीक वाचवण्यासाठी धावपळ करत आहेत. साधारणतः नाशिक जिल्ह्यातल्या निफाड भागात मोठ्या प्रमाणात द्राक्षाचं उत्पादन घेतलं जातं. अतिथंड वातावरण द्राक्षपिकासाठी हानिकारक असतं. कमीत कमी 6 अंश सेल्सिअस इतपत थंड हवामान या पिकासाठी चांगलं असतं. पारा त्याखाली घसरल्यास द्राक्षाला तडे पडायला सुरुवात होते आणि घोस खराब होऊ शकतो.

सध्या नाशिकचा पारा घसरून 5 अंश सेल्सिअस इतका झाला आहे. मध्यरात्रीपासून ते सकाळी सात वाजेपर्यंत थंडीचा कडाका प्रचंड असल्याने त्याचा परिणाम द्राक्षांच्या उत्पादनावर होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी नाईट ड्युटी करत आहेत. त्यांनी थंडीमुळे जमीन कोरडी पडू नये म्हणून ठिबक सिंचनाची मदत घेतली असून तापमान उबदार ठेवण्यासाठी शेकोट्या पेटवण्यात येत आहेत.