ते मला गोळ्या घालतील, पण हात लावू शकणार नाहीत! मी मोदींना घाबरत नाही!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कृषी कायद्यांवरून मोदी सरकारवर मंगळवारी पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला. मी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही. ते माझ्यावर गोळ्या झाडतील, पण मला हात लावू शकणार नाहीत. मी सच्चा देशभक्त आहे. आपल्या देशाचे रक्षण करणार, कोणी मला साथ दिली नाही तरी एकटा लढणार, हाच माझा धर्म आहे, अशा शब्दांत राहुल यांनी भाजपला ठणकावले.

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राहुल गांधी हे शेतकऱयांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप ट्विटरवरून केला. त्याला पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर देताना राहुल यांनी मोदी सरकारचे वाभाडे काढले. याचवेळी त्यांनी कृषी कायद्यांमधील त्रुटी सांगणारी माहितीपत्रिका प्रसिद्ध केली. मोदी सरकारने नवीन कृषी कायदे देशातील कृषी व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी तयार केले आहेत. सरकारच देशाची दिशाभूल करीत आहेत. देशात आज वाईट घटना घडताहेत. मी केवळ शेतकऱयांचीच गोष्ट करीत नाही. हा मुद्दा वाईट घटनांचा एक भाग आहे. हा वर्तमानाचा नव्हे, तर तरुण-तरुणींच्या भविष्याचा सवाल आहे, असे राहुल यांनी नमूद केले. सरकारविरोधात कोणी बोलले, तर त्यांना थेट देशद्रोही ठरवले जाते. सत्ताधारी मात्र बोलताना कुठलाही विचार करीत नाहीत, असेही ते म्हणाले.

देशाकडे स्ट्रटेजिक व्हिजनच राहिले नाही!

लडाखच्या सीमेवर चीनच्या कुरापती सुरूच आहेत. या पार्श्वभूमीवरही राहुल यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला. चीनकडे स्ट्रटेजिक व्हिजन आहे. मात्र हिंदुस्थानकडे नेमका याचाच अभाव आहे. डोकलाम आणि लडाखमध्ये घुसखोरी केल्यानंतर चीनचा इशारा स्पष्टपणे समजतो. चीनला वेळीच धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असे राहुल म्हणाले.

देशातील शेतकऱयांनाच संपवण्याचा मोदींचा डाव

पंतप्रधान मोदी हे फक्त तीन कृषी कायद्यांवर थांबणार नाहीत. ते टप्प्याटप्प्याने शेतकऱयांनाच संपवायला निघाले आहेत. जेणेकरून त्यांना देशातील शेती आपल्या जवळच्या तीन-चार मित्रांच्या हाती हवाली करता येईल. काँग्रेस पक्ष शेतकऱयांच्या पाठिशी आहे. आम्ही शेतकरी आंदोलनाचा सन्मान करतो. मोदी सरकार शेतकऱयांना थकवू शकते, मात्र मूर्ख बनवू शकत नाही, असा इशारा राहुल यांनी या वेळी दिला.

महाराष्ट्राची संत परंपरा दिल्लीच्या राजपथावर

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील ऐतिहासिक राजपथावर होणाऱया पथसंचलनासाठी ‘‘महाराष्ट्राच्या संत परंपरे’वर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. चित्ररथ बांधणीचे काम नागपूर येथील ‘टीम शुभ’चे प्रमुख राहुल धनसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या