शेतकऱ्यांनी सुरत-नागपूर महामार्गाचे काम बंद पाडले

सामना ऑनलाईन, धुळे

सुरत-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या; परंतु मोबदला देताना त्यात तफावत करण्यात आली. त्यामुळे संपादित जमिनीचा सर्वाना समान मोबदला मिळायला हवा. काही शेतकऱ्यांचे म्हणणेच ऐकले नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांसाठी सुनावण्या घ्याव्यात यासह अन्य मागण्यांसाठी धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. घोषित केल्याप्रमाणे शुक्रवारी महामार्ग चौपदरीकरणाचे काम बंद केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. समान मोबदला मिळाल्याशिवाय यंत्रणेला आम्ही महामार्गाचे काम करू देणार नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

सुरत-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकणासाठी धुळे जिल्हय़ातील साक्री आणि धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी संपादित करण्यात आल्या पण या प्रक्रियेत अनेक शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. काही शेतकऱ्यांना जास्त तर काही शेतकऱ्यांना तुटपुंजी नुकसानभरपाई मिळाली आहे. सर्व शेतकऱ्यांना समान मोबदला मिळावा या मुख्य मागण्यांसाठी अन्य काही लाभ मिळावेत असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पण शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले म्हणून पुर्व नियोजित घोषणेप्रमाणे शुक्रवारपासून शेतकऱ्यांनी महामार्गाचे काम रोखले. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी घेतांना त्यांचे म्हणणे देखील ऐकुण घेतलेले नाही. महामार्गाची अधीसुचना ज्या वेळी प्रसिध्द केली होती त्यावेळी तत्कालीन महसुलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधान सभेत एकरी एक कोटी रुपये मोबदला देण्याची घोषणा केली होती. पण आता हक्काच्या अपेक्षीत मोबदल्यासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर यावे लागत आहे.

मोबदला देतांना काही शेतकऱ्यांना एक पट तर काही शेतकऱ्यांना चार पट मोबदला देण्यात आला आहे. समान मोबदला मिळावा म्हणून थेट दिल्लीपर्यंत पाठपुरावा झाला. पण सर्व पातळीवर केवळ आश्वासने मिळाली. राष्ट्रीय राजमार्ग प्राध़िकरणाने प्रसिध्द केलेल्या अधीसुचनेनुसार प्रलंबीत दावे निकाली काढावेत. महामार्ग चौपदरीकरण करायचा म्हणून जमिन संपादीत होते पण प्रत्यक्षात सहा पदरी रस्ते तयार केले जात आहेत. त्यासाठी झाडांची कत्तल करण्यात आली आहे. या सर्व बाबींचा सरकारने गांभीर्याने विचार करावा. समान मोबदला मिळत नाही तोवर शेतकरी महामार्गाचे काम थांबवतील असे स्पष्टीकरण शेतकऱ्यांनी दिले.

या आंदोलनाच्या अग्रस्थानी संग्राम पाटील, शशिकांत शिंदे, बाळू सोनवणे, राजेंद्र शिंदे, फकिरा चौधरी, संजय शिंदे, उमेश चौधरी, नामदेव पाटील, सुदाम महाले, पंढरीनाथ पाटील, इंदिरा परदेशी, शांता परदेशी यांच्यासह बहुसंख्य नागरिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या