जोडजवळा येथे शेतकऱ्याची आत्महत्या, २० तास मृतदेह रुग्णालयातच

18

सामना प्रतिनिधी । लातूर

तालुक्यातील मौजे जोडजवळा येथील एका शेतकऱ्याने रविवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी ५ वाजता मृतदेह शवविच्छेदनासाठी जोडजवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आला होता. वैद्यकीय अधिकारी नसल्याने तब्बल २० तास मृतदेह शवविच्छेदनासाठी पडून होता. यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

ऐन पोळ्याच्या सणादिवशीच सायंकाळी जोडजवळा येथील शेतकरी अच्युत सखाराम वाघ (वय ५५) यांनी रविवार दि. ९ रोजी गळफास लाऊन घेऊन आत्महत्या केली. त्यांनी चार एक्कर शेतीत सोयाबीन पेरले होते परंतु सोयाबीन पिक पावसाअभावी करपून गेले. त्यामुळे नैराश्य येऊन त्यांनी गळफास घेतला. सायंकाळी ५ वाजता जोडजवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला होता. मात्र वैद्यकीय अधिकारीच कोणी उपस्थित नसल्याने मृतदेह तसाच पडून होता. तब्बल २० तास मृतदेह जोडजवळा प्राथमिक आरोग्य केंद्रात पडून होता. आज दुपारी १ वाजता शवविच्छेदन करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपस्थित नसल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत होता. मयत अच्युत वाघ यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या