आम्ही हरलेलो नाही, आमची जिद्द कायम! आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींनी दिली SSCची परीक्षा

3105

पतीच्या आत्महत्येने खचून न जाता, धीर न सोडता नव्याने उभारी घेत काम करणाऱ्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या तीन पत्नींनी आज नवा आदर्श समाजासमोर ठेवला. तीन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींनी मुलांना शिक्षण देत स्वत:ही अभ्यास करीत दहावीची परीक्षा दिली. आम्ही हरलेलो नाही, आमची जगण्याची जिद्द कायमच आहे, हे त्यांनी दाखवून दिले.

अर्धापूर तालुक्यातील धामदरी येथील सुनीता कदम, मालेगाव येथील मंगला इंगोले व अर्धापूर येथील लक्ष्मी साखरे या तीन महिलांनी शेतकरी पतींच्या आत्महत्येनंतर खचून न जाता मुलांच्या शिक्षणासोबत आपलाही दहावीचा अभ्यास सुरू केला. दहावीची परीक्षा देण्यासाठी बहि;स्थ विद्यार्थी म्हणून त्यांनी 17 क्रमांकाचा अर्ज वेळेवर भरला आणि त्यांचे हॉलतिकीटही आले.

आजपासून दहावीची परीक्षा सुरू झाली. धामदरी येथील सुनीता कदम, मालेगाव येथील मंगला इंगोले व अर्धापूर येथील लक्ष्मी साखरे या तिघींनी अर्धापूरच्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या केंद्रात मराठी विषयाचा पेपरही चांगल्या प्रकारे सोडवला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी त्यांना परीक्षेच्या अगोदर शुभेच्छा दिल्या.

अर्धापूर तालुक्यात पुण्यातील भोई प्रतिष्ठानच्या पुढाकारातून पुण्यजागर प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत पुण्यातील काही नागरिकांनी याच आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली होती. पुण्यजागर प्रकल्पाचे डॉ. मिलिंद भोई, लक्ष्मीकांत मुळे, गुणवंत वीरकर, मुख्याध्यापक डॉ. शेख, रमेश करंजीकर यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. आलेल्या संकटावर मात करत धैर्याने पुढे जाण्यासाठी या महिला सरसावल्या आणि आज नवा आदर्श घालून दिला. धीर सोडायचा नाही, आलेल्या संकटाला सामोरे जायचे, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी

दरम्यान, मंगळवारपासून सुरू झालेल्या दहावीच्या परीक्षेला एकूण 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी 9 लाख 75 हजार 894 विद्यार्थी तर 7 लाख 89 हजार 894 विद्यार्थिनी आहेत. राज्यभरात एकूण 4 हजार 979 परीक्षा केंद्रांवर परीक्षा होत आहे. ही परीक्षा 23 मार्च 2020 पर्यंत चालणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या