नाशिक जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

51

नाशिक – नाशिक जिल्ह्यातील मालेगाव व देवळा तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून तणावाखाली आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील ५०वर्षीय जगन्नाथ विठ्ठल अहिरे यांनी बुधवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांची शेजारील मालेगाव तालुक्यातील नांदगावला ०.६३ आर एवढी शेतजमीन आहे. त्यांच्यावर सोसायटी व बँकेचे सुमारे दीड लाखाचे पीककर्ज असल्याचे समजते. कर्जफेडीच्या चिंतेने तणावाखाली त्यांनी जीवन संपविले. याबाबत वसंत लक्ष्मण वाघ यांनी दिलेल्या माहितीवरुन मालेगाव तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.

मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावातील शेतकरी महादू कारभारी पवार (५५) यांनी सोमवारी राहत्या घरी विष प्राशन केले. प्रथम त्यांना खासगी रुग्णालयात त्यानंतर पुढील उपचारासाठी मालेगाव शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान काल रात्री साडेआठ वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांचीही नांदगावला ०.८७ आर एवढी शेतजमीन आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या